Breaking

विशेष लेख : कलम 370 आणि राममंदिर दोन्ही महत्वाचे निर्णय 5 ऑगस्ट या एकाच दिवशी घेणे हा योगायोग असू शकेल काय? - विशाल पेटारे


         कित्येक दशके वादाचा मुद्दा असणारे राम जन्मभूमीचा प्रश्न सर्वोच न्यायालयाने मार्गी लावला. त्यानंतर 5 ऑगस्टला अखेर भूमी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. देशविदेशातील मीडियाने या भूमीपूजनेचे थेट प्रसारण केले. हे भूमिपूजन आणि 5 ऑगस्ट हि तारीख देशात इतिहास घडवून गेली. देशात 5 ऑगस्ट हि तारीख इतिहास घडवणारी पहिलीच वेळ नाही, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय हा सुद्धा गेल्या वर्षी याच 5 ऑगस्टला घेण्यात आला होता. कलम 370 रद्द आणि राममंदिराचे भूमिपूजन हे दोन्ही महत्वाचे निर्णय 5 ऑगस्ट या एकाच दिवशी घेणे हा योगायोग असू शकेल काय?

       जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे (कलम 370) पाच ऑगस्टला रद्द करून आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. हे कलम रद्द करण्यासाठी गेली कित्येक वर्ष भाजप झटत होते. जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांचा अत्यंत अस्मितेचा आणि कळीचा असा राष्ट्रीय मुद्दा असणारे कलम 370 रद्द करणे हे सामान्यबाब नव्हे, देशभरातील अनेक लोक त्या निर्णयाने आनंदी झाले त्यावरून हे कलम रद्द करणे किती आवश्यक आहे, हे भारतीय नागरिकांच्या मनावर बिंबवण्यासाठी भाजप आणि संघ परिवाराने कोणकोणते आणि किती पर्याय अवलंबले असतील हा मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यात भाजप यशस्वी सुद्धा झाले. आणि आता पाच ऑगस्टला देशभरातील हिंदू धर्मियांचा अस्मितेचा मुद्दा असणारे "राम मंदिर" याचे हि भूमीपूजन 5 ऑगस्टला झाले. 

       देशाच्या इतिहास ऑगस्ट महिना फार महत्वाचा आहे, 15 ऑगस्टला भारताला ब्रिटिशांच्या हातून स्वातंत्र्य मिळाले. 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून सुद्धा देशभरात साजरा केला जातो. याच 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस सुद्धा येतो. हा वेगळा मुद्दा परंतु क्रांती दिवस आणि स्वातंत्र्य दिवस हे दोन दिवस देशाच्या इतिहासात फार महत्वपूर्ण आहेत. असे असताना देशात आणि जगात कोरोनाने थैमान घातले असताना, दररोज भारतात जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत असताना, कोरोनाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या नंबर वर असताना या वैश्विक महामारीत नेमकं 5 ऑगस्टलाच राम मंदिराचे भूमिपूजन करणे हि गोष्ट सामान्य असू शकेल काय? किंवा हा योगायोग असू शकेल काय? तसेच क्रांती दिवस आणि स्वातंत्र्य दिवस या दोन्ही दिवसाच्या अगदी तोंडावरच हे दोन महत्वाचे निर्णय का? असाही प्रश्न उपस्थित होतो. या पाठीमागे कोणते षडयंत्र/कारस्थान असू शकेल काय हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. असे कित्येक प्रश्न मनात घोळत असले तरी सध्या कोणत्याही ठाम मतावर पोहोचणे योग्य नाही. त्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहणे आवश्यक आहे.

- विशाल पेटारे
- जुन्नर, पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा