Breaking

नेट नाही त्यांनी लेक्चर डाऊनलोड करा! विद्यापीठाच्या परिपत्रकाचा बुक्टूकडून समाचार

मुंबई : ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही त्यांनी यूट्युब, फेसबुकवरून व्हिडिओ आणि अन्य साहित्य डाऊनलोड करून घ्यावे, असे म्हणणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाचा बुक्टूकडून निषेध करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याबाबत मुंबई विद्यापीठाने एक परिपत्रक काढले आहे. २४ ऑगस्ट २०२० रोजी काढलेल्या या परिपत्रकात विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही त्यांनी यूट्युब, फेसबुकवरून व्हिडिओ आणि अन्य साहित्य डाऊनलोड करून घ्यावे असे म्हटले आहे. बुक्टू या शिक्षक संघटनेने या परिपत्रकाचा कडाडून विरोध केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारित मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील महाविद्यालये येतात. यापैकी मुंबई आणि ठाण्याचा शहरी भाग वगळता उर्वरित ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. रायगडला तर अलीकडेच पुराचा मोठा फटका बसला आहे. परिणामी हजारो विद्यार्थ्यांकडे वीज, इंटरनेट कनेक्शन इतकेच काय स्मार्टफोन देखील नाहीत. त्यांचा विचार विद्यापीठाने केलेले नाही, अशी बुक्टू संघटनेची तक्रार आहे.

विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये ७ ऑगस्ट २०२० पासून प्राथमिक स्तरावर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. आता ते टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने सुरू राहील, याची माहिती देणारे हे परिपत्रक आहे. मात्र त्यात ज्यांना ऑनलाइन अँँक्सेस नाही त्या विद्यार्थ्यांकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचा बॉम्बे युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स युनियन (BUCTU) चा आरोप आहे. म्हणूनच हे परिपत्रक विद्यापीठाने मागे घ्यावे यासाठी बुक्टूने मोहिम सुरू केली आहे. बुक्टूच्या सर्व युनिटकडून मुंबई विद्यापीठांच्या कुलसचिवांना ई-मेल पाठवून या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाची वास्तवाशी नाळ तुटली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

'ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, संगणक, इंटरनेट कनेक्शन नाहीत, त्यांना ऑनलाइन लेक्चरचा अॅक्सेस नसेल तर डाऊनलोड करा हे सांगणं हास्यास्पद आहे. ज्या विद्यार्थ्यांना साधा मोबाईल रिचार्ज करणं कठीण जातं त्यांची ही क्रूर थट्टा आहे. विद्यापीठाला त्यांच्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांबाबतची माहितीच नाही असा याचा अर्थ आहे. म्हणून विद्यापीठाने हे परिपत्रक तातडीने मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे,' असे बुक्टूच्या सरचिटणीस प्रा. मधु परांजपे यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा