Breaking

अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलून परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची सोय करा - SFI

मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी निर्णय दिला. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील. परंतु या परीक्षा लगेच घेणे कठीण असल्याने त्या किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच परिक्षेदरम्यान सरकारने विद्यार्थ्यांची निःशुल्क संपूर्ण व्यवस्था करावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेल निवेदनाद्वारे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीने केली आहे.

मागील ५-६ महिन्यांपासून जगभरात आणि देशात कोरोना महामारीने थैमान घातला आहे. तेव्हापासून आजपर्यंत देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अंतिम वर्ष वगळता सरकारने इतर वर्षातील विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यासोबतच अंतिम वर्षाची परीक्षा देखील रद्द करण्यात यावी, ही मागणी देशभरातून करण्यात आली. त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि न्यायालयाने त्यावर निर्णय देखील दिला. त्यानुसार आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील.

परंतु, अंतिम वर्षाच्या परीक्षा आता लगेच घेण्यात येऊ नये. या परीक्षा किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच त्याची तारीख विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कळवण्यात यावी. तसेच परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची संपूर्ण निःशुल्क सोय सरकारने करावी, अशी मागणी एसएफआय करते.

कारण, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध शहरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांत प्रवेशित आहेत. यात ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षण घेतात. म्हणून सरकारने सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून परीक्षेचे नियोजन करावे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा देखील विचार व्हावा. जसे की असाईटमेंटच्या माध्यमातून परीक्षा घेता येईल. ते सबमिट करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यलयात संगणक व इंटरनेटची व्यवस्था करता येईल. जेणेकरून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, काही अपरिहार्य कारणास्तव काही विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता येत नसेल तर त्यांना तसा वेळ वाढवून देण्यात यावे, परिक्षेसाठी अपंग विद्यार्थ्यांना विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात,  सरकारने परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करावी,  परिक्षेदरम्यान सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात यावी,  सर्व परीक्षा केंद्रे सॅनिटाईझ करावेत. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी. त्यांना महामारीची लागण होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, परीक्षा देण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याची दक्षता घेण्यात यावी, परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही धोका निर्माण झाल्यास आरोग्य विमा देण्यात यावा आदी मागण्या एसएफआय चे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा