Breaking

माकपची जिल्हा कचेरी समोर भरपावसात तीव्र निदर्शने, 'या' केल्या मागण्या. वाचा सविस्तर

नांदेड : लॉकडाऊन काळातील सर्व गरजूंना उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा या व इतर मागण्या साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर भर पावसात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांंना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबाना सात हजार पाचशे रूपये आर्थिक मदत करून प्रती व्यक्तीस दहा किलो धान्य पुरवठा करण्यात यावा, नांदेड रेल्वे स्टेशन येथील कंत्राटी कामगारांचे पगारामधील लाखो रूपये हडप करणाऱ्या रेल्वे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वाहन धारक व मायक्रो फायनान्स धारकांना एजन्ट व वसूली करणारे गुंड जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन केंद्राने केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करीत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करा. अल्का गुल्हानेंचा मंजूर झालेला मावेजा निधी तात्काळ त्यांना अदा करा, डॉ. नरेन्द्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना मुख्य सुत्रधारांना अटक करा. नांदेड शहरातील व जिल्ह्यातील काही खाजगी हॉस्पिटल कडून कोरोना रूग्णांची आर्थिक लूट होत असल्या प्रकरणी अनेक तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत त्या तक्रारी प्रमाणे कठोर कारवाई करा, आदी मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनाचे नेतृत्व सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, मारोती केंद्रे, अनुराधा परसोडे, दत्ता इंगळे, रविन्द्र जाधव, जयराज गायकवाड, इस्माईल खान, मीरा बहादूरे, अनुसया गोटमुखे, सिमा गजभारे, रब्बाना पठाण, पार्वती सुर्यवंशी आदींनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा