Breaking

जालना जिल्हाधिकाऱ्यांनी कॉम्रेड गोविंद आर्दड यांच्यावर दादागिरी केल्याचा किसान सभेचा आरोप. वाचा सविस्तर.

जालना : जालना जिल्हाधिकाऱ्यांनी कॉम्रेड गोविंद आर्दड दादागिरी केल्याचा आरोप करत किसान सभेने जिल्हाधिकारी यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

गोविंद आर्दड यांनी आशा कर्मचाऱ्यांची बाजू घेतली व त्यांच्या रास्त मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला सहाय्य केले या कारणासाठी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनीच जालना जिल्हाधिकाऱ्यांनी कॉम्रेड आर्दड यांना कार्यालयात बोलावून अत्यंत चुकीच्या पद्धतीने दमदाटी केली आणि धमकावले, असल्याचे किसान सभेने म्हटले आहे. इतकेच काय तर यांना कोविड वॉर्डात टाका! अशा प्रकारची भाषा वापरली असून जालना जिल्हाधिकाऱ्यांचे हे वर्तन अत्यंत हीन दर्जाचे असून अशोभनीय असल्याचे किसान सभेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

जिल्हाधिकारी अशा प्रकारचे वर्तन करणार असतील अजिबात खपवून घेणार नाही, असे किसान सभेने म्हटले आहे. तसेच प्रसंगी संपूर्ण ताकदीने अशा प्रवृत्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे।

गोविंद आर्दड हे अखिल भारतीय किसान सभेचे किसान सभेचे कार्यकर्ते आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, पेन्शन मिळावे, पीक नुकसानीची भरपाई मिळावी, पीक विमा मिळावा, दूध, ऊस, कापसासह सर्व शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी कॉम्रेड गोविंद आर्दड सातत्याने संघर्षाचे नेतृत्व करत आले आहेत. 


आशा कर्मचाऱ्यांची जालना जिल्ह्यात अत्यंत लढाऊ संघटना उभी करून आशांना न्याय मिळवून देण्यात कॉम्रेड आर्दड यांनी मोठे काम केले आहे. अशा लढाऊ व ध्येयवादी कार्यकर्त्याचे मनोबल कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले कृत्य अत्यंत निंदनीय असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी पुकारलेला लढा कॉम्रेड गोविंद आर्दड पुढे नेऊ पाहत आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या मतदार संघातच लढ्याचे निशाण फडकविले जात आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या अमानुष आर्थिक शोषणाची काळी बाजू आपल्या मतदार संघातच उघड होत असल्याचे आरोग्य मंत्र्यांना यामुळे पाहावे लागत आहे. सत्य अशा प्रकारे बाहेर येऊ नये म्हणून आरोग्य मंत्र्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी संगनमताने कॉम्रेड गोविंद आर्दड यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. 

डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले आदींनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा