Breaking

पुणे जिल्हा न्यायालयातील वकील संघटना आणि समतेसाठी वकील तर्फ़े प्रशांत भूषण यांच्या वरील कारवाईचा जाहीर निषेध.

पुणे : सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात व ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ आणि सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात काळ्या फिती बांधून शांततापूर्ण निषेध सभेचे आयोजन आज शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर करण्यात आले होते. यामध्ये लोकायतची वकिलांची आघाडी "समतेसाठी वकील" तसेच पुणे जिल्हा न्यायालयातील विविध वकील संघटना सामील झाल्या होत्या.

अ‍ॅड. प्रशांत भूषण (सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात व ज्येष्ठ वकील) यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत दोषी ठरवण्यात आले. याचे कारण काय तर त्यांनी केलेले दोन ट्वीटस! ज्येष्ठ विधिज्ञांनी या निर्णयाबद्दल असहमती दर्शवत म्हटले आहे की "भूषण यांची विधाने अयोग्य, तर्कविसंगत असू शकतात. परंतु यातून न्यायालयाची अवमानना होत नाही." सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत तत्परतेने त्यांना दोषी ठरवत निर्णय दिला की, ‘ही टिप्पणी खोटी, द्वेषमूलक व कलंकित करणारी आहे. यामुळे जनतेच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाईल.’ न्यायव्यवस्थेची टीका करणे म्हणजे तिचा अपमान करणे आहे का? नाही.. टीका करणे म्हणजे अपमान करणे नाही.

याचा अर्थ असा होतो की आपण टीका करू नये. जे बोलायचे ते चांगले बोलावे नाहीतर गप्प बसावे. संविधानाच्या कलम 19(1)(A) नुसार  देशातील प्रत्येक नागरिकास भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. 

वरील कारवाई ही या हक्काची पायमल्ली आहे, म्हणूनच आज पुणे जिल्हा न्यायालयातील अनेक वकीलांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. "संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार अबाधित राहावे म्हणून आम्ही बोलतोय, विरोध दर्शवतोय. आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आम्ही ती घेत आहोत" असे प्रतिपादन सामील झालेल्या वकीलांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा