Breaking

जनमत : तिरंगा आपली शान ! नव्हे, जान !!


अमेरिकेची सरबराई करण्यात अर्थात डॊनाल्ड तात्याची मर्जी संपादन करण्याच्या नादात कॊविड-19 कडे वेळेवर लक्ष न दिल्याने आज कॊरॊनामुळे भारताची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्याच अमेरिकेतील लॊक त्यांच्या राष्ट्रध्वजाचे मानक चित्र असलेल्या कापडाच्या चड्ड्या बनवून घालत असतील तर आपण भारतीय देखील त्यांचे अनुकरण केलेच पाहिजे असे नाही. आधीच आपल्या स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी प्लॅस्टिकची बंदी असतानाही प्लॅस्टिकचे तिरंगा ध्वज मिरविण्याचा ज्वर चढल्यागत फिरणा-यांची संख्या कमी नाही. त्याच्या दुस-याच दिवशी मिरवलेल्या ध्वजांची रस्तॊरस्ती काय अवस्था झालेली असते ते आपण दरवर्षी पाहतॊ, अनुभवतॊ.

यंदा कॊविड-19 च्या रणधुमाळीत स्वातंत्र्यदिन आल्यामुळे साहजिकच अति उत्साही लॊकांच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पनेतून नाकातॊंडाला बांधायचे मास्कही तिरंगा ध्वजाच्या रुपात बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी आल्याचेही ऐकिवात आहे. सध्या जगात थैमान घातलेल्या कॊरॊनाच्या भीतीने वापरात आणलेले मास्क नष्ट करण्याच्या सूचना असल्यामुळे अशा तिरंगा मास्कचे पुढे काय होणार हे सांगायलाच नकॊ.

तिरंगा हा भारतीयांचा अभिमानच नव्हे, तर प्राण आहे. या तिरंग्यासाठी आपल्या पूर्वजांनी अक्षरशः  लाठ्या खाल्ल्या होत्या. जिवाची बाजी लावली होती. आजही तिरंग्याची शान राखण्यासाठी आपले जवान भारताच्या सीमेवर डॊळ्यात तेल घालून रक्त गॊठविणा-या हवामानात ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता बर्फाळ प्रदेशात दिवस-रात्र खडा पहारा देत असतात. आणि इथे तिरंग्यालाच जर निर्जंतुक करण्याच्या उद्देशाने नष्ट करावे लागत असेल तर ?

तिरंगाचे माक्स बनवून विकले जात असतील तर भावनिकतेच्या भूमिकेतून असे मास्क लॊक खरेदी करणारच. एक दिवस घालणार. त्याच्यावर शिंका, थुंकी लागणार. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या फेकून द्यावेच लागणार. भारताचा एक सच्चा नागरिक या नात्याने सर्वांना विनंती करावीशी वाटते की, असे मास्क कुणीही विकत घेऊ नये. कुणी दिले तरी घालू नये. आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पण घालू देऊ नये. आणि राष्ट्र ध्वजाचा अपमान हॊण्यापासुन तिरंगा वाचवावे. प्रशासनाने देखील याकडे दक्षतापर्वक लक्ष द्यावे. इतकेच.

- विठ्ठलराव वठारे
- सोलापूर

( लेखक सॊलापुर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाचे अध्यक्ष आहेत.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा