Breaking

महिला सुरक्षा आणि टाळेबंदी - कल्याणी संध्या अंकुश

मार्च २०२० पासून संपूर्ण भारत भर लॉकडाऊन लागू झाला. कोरोना या आजाराची साथ रोखण्यासाठी शासन सुरुवातीला त्याचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करत होते. या मध्ये शासनाच्या आरोग्य विभागांनी नियोजितरीत्या काम गिरी सुरू केली. देशाच्या सुरक्षा विभागाचीही मदद या काळात आपल्याला घ्यावी लागली. या सगळ्यात आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा  या बाबींवर विशेष भर देण्यात आला. 

परंतु शासनाच्या नजरेत महिला सुरक्षा हा मुद्दा दुर्लक्षितच राहिला. या टाळेबंदी च्या काळात इतर साधारण वेळेपेक्षा घरघुती हिंसाचार आणि मानसिक छळ यांचे प्रमाण काहीच दिवसात भराभर वाढलेले दिसले.

राष्ट्रीय महिला आयोग च्या आकडेवारी नुसार डिसेंबर २०२० ते मार्च २०२० पर्यंत महिला अत्याचाराच्या तक्रारींचा आकडा १,५५० असा होता. या चार महिन्यांच्या आकडेवारी पेक्षा मार्च ते एप्रिल च्या काहीच दिवसात हा आकडा दुपटीने वाढला, व त्याचे प्रमाण २,३२० इतके झाले.

या झाल्या नोंदवल्या गेलेल्या तक्रारी. परंतु अशा कित्येक तक्रारी नोंदवल्या जात नाहीत.कित्येक गुन्ह्यांवर घरच्या घरीच पांघरूण घातले जाते.किंवा बाहेर वाच्यता केली जात नाही. या काळात ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या गेल्या परंतु अशा कितीतरी ग्रामीण भागातील , गरीब कुटुंबातील , महिला आहेत ज्यांना ही आधुनिक साधने हाताळता देखील येत नाही. मेल कसा पाठवला जातो हेही माहिती नसते.किंवा अशी काही तक्रार online करता येते ह्याचा गंधही नसतो.परंतु त्यांना त्रास सहन करावा लागतो.

राष्ट्रीय महिला आयोग च्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले की महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येईल. परंतु यावर अजून काही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

भारतीय कुटुंब व्यवस्थेत जसे पुरुषाचे प्रत्येक बाबतीत वर्चस्व असते तसे कुटुंबातील स्त्रियांचा आदर करणे हेही त्याचे परम कर्तव्य असले पाहिजे. भारताची संस्कृती आणि शिष्टाचार यांचा जगभर आदर केला जातो. परंतु त्याच भारतात घरातल्या महिला स्वतः च्या कुटुंबासोबत सुरक्षित नाहीत ही शरमेची बाब आहे. ज्यादातर केसेस मध्ये गुन्हेगार हा महिलेचा पती, प्रियकर, वडील, भाऊ, नातेवाईक यांपैकीच  एक असतो. ही देखील खेदाचीच बाब आहे. ज्या देशातील लोक धर्माला त्यांच्या संस्कृती ची अस्मिता आणि प्राण मानतात त्या देशात ही कोणती नवीन हिंसाचाराची संस्कृती रुजत आहे ? का ही आधीपासूनच होती आणि आता उघडकीस येत आहे ? हा प्रत्येक भारतीय शिक्षित नागरिकांच्या आत्मचिंतनाचा भाग आहे.

टाळेबंदी मध्ये घरात पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असताना त्याला काहीच पर्याय नव्हते.संचार बंदी असल्याने अनेक महिला आपल्या घरी माहेरी जाऊ शकल्या नाहीत.आणि पोलीस स्टेशन ला तक्रार करण्याची हिंमत एकवटू शकल्या नाहीत. या काळात पुरुषांना त्रासाला सामोरे जावे लागले असे नाही परंतु महिला अत्याचार आणि हिंसाचाराचे प्रमाण याकाळात मोठ्या प्रमाणात वाढले. याचा अर्थ काय आहे ? याचा विचार आपण केला पाहिजे.

टाळेबंदी च्या काळात महिलांशी संबंधित  सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. NCW च्या आकडेवारी नुसार २५ मार्च ते २५ एप्रिल पर्यंत सायबर सेल कडे ४१२ सायबर क्राईम च्या तक्रारी आलेल्या आहेत. आणि त्या पैकी ३९६ तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या आहेत. उदाहरणार्थ - अश्लील पोस्ट, अनावश्यक अश्लील चित्रे, धमक्या यासारख्या प्रकरणांचा त्यात समावेश आहे. सायबर तज्ज्ञांच्या म्हणण्या नुसार या तक्रारी म्हणजे फक्त 'हिमनगाचे टोक' आहे.

आकांचा फाउंडेशन ह्या सायबर क्राईम मध्ये महिलंसंदर्भात काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका आकांचा श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार जिथे दररोज साधारण १० तक्रारी येत होत्या तिथे टाळेबंदी पासून याचे प्रमाण २०-२५ असे झाले आहे. महिलांचे अकाउंट, ई-मेल हॅक करून त्यांना फोटो प्रसारित करण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळणारे एक रॅकेटच कार्यरत आहे असे त्या म्हणतात.

सेक्स्टोरेशन मोर्फेड प्रतिमांद्वारे त्यांच्या लैंगिक कृतीचा पुरावा उघड करण्याची धमकी देऊन एखाद्याकडून पैसे मिळवणे ह्या कृती सर्रास घडत आहेत. 

सायबर पीस फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष विनीत कुमार म्हणाले की , अनेक महिलांना या संदर्भात अधिकृत तक्रारी करायच्या नसतात. (याची कारणे आपल्या दांभिक सामाजिक व्यवस्थेतच आहेत असे मला वाटते.)

एकूणच महिला व मुली स्वतःच्या कुटुंबासोबत देखील सुरक्षित नाहीत व त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक माध्यमांद्वारे व्यक्त होण्यास सुद्धा मर्यादा येत आहेत. उत्तरप्रदेश मधील खिरापूर जिल्ह्यातील इसापूर गावात एका १४ वर्षाच्या मुलीवर झालेली बलात्काराची घटना तर अतिशय घृणास्पद आहे. अशा अनेक महिला हिंसाचाराच्या कित्येक घटना घडत आहेत आणि त्यावर त्या कुठे व्यक्त होऊ शकत नाहीत ही गंभीर बाब आहे.
माध्यमांमध्ये या घटनांविषयी चर्चा आणि वादविवाद दाखवले जात नाहीत. या याहून त्यांना राजकारण, नेते आणि बॉलिवूड च्या चटपटीत खमंग खबरी आणि त्यावर वादविवाद दाखवून लोकांचे मनोरंजन करण्यात प्रथम कर्तव्य मानतात

कल्याणी संध्या अंकुश 
पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा