Breaking

'या' आदिवासी भागातील जमिनीला मोठ्या भेगा पडून गावातील मोठी जमिन सरकली; नवीन घरांचे मोठे नुकसान, गावाचे माळीण होण्याची भीती


जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे सध्या जमिनीला मोठ्या भेगा पडून गावातील जमिन सरकून पुढे भेगा पडण्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. गावाचे माळीण होण्याची देखील भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून भिवाडे बुद्रुक या भागात पावसाचा जोर जास्त असल्याने हि जमीन खचून जमीनीला मोठ्या भेगा पडत आहे. त्यामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे, त्यात नवीन बांधलेल्या घरकुलाचे देखील दोन भाग झाले आहे यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. जमीन ठिकठिकाणी सरकली असून विद्युत खांब पडले आहेत. तसेच विहिरींचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र शासन व प्रशासन यांनी वेळीच लक्ष न दिल्यास भिवाडे बुद्रुकचे माळीण होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

भिवाडे बु. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. पावसामुळे शिवाजी विठ्ठल विरणक यांच्या घरापासून ते नदीपर्यंत अंदाजे 300 मीटरपर्यंत जमिनीला मोठ्या आकाराच्या भेगा पडल्या आहेत. यात नव्याने बांधलेल्या घरकुलाचे पूर्णतः नुकसान झाले आहे तसेच जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.

ज्या प्रकारे माळीन मध्ये वर पाणी मुरून खाली निघत होते तसेच काही प्रमाणात पाणी गावात मुरून थेट नदीत निघत आहे. परिणामी गावा खालील बरीच जमीन सरकली आहे व ही सारी जमीन धरणालगत आहे, त्यामुळे धरणाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच नामदेव विरणक, उपसरपंच नंदा विरणक, ग्रामसेवक शशिकांत बागुल व ग्रामस्थांनी घटनेची माहिती तहसीलदार कोळेकर यांना दिली. तलाठ्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश यावेळी तहसीलदार कोळेकर यांनी दिले. 

हि घटना शनिवारी (ता. २२) रोजी घडल्या नंतर विष्णू घोडे यांनी ही बाब सोशल मीडियावर टाकल्या नंतर वाऱ्या सारखी पसरली त्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा