Breaking


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा - SFI


बीड :
जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर येथील पोलिस ठाण्याजवळ असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ने निषेध व्यक्त केला आहे व पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी एसएफआय चे जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे यांनी केली आहे.


बुधवार (दि.२८ ऑक्टोबर) रोजी पहाटे चार ते पाचच्या सुमारास काही माथेफिरू समाजकंटकांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. याचे तीव्र पडसाद बर्दापूर परिसरासह जिल्हा व राज्यभर उमटले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ही घटना अत्यंत निंदनीय आहे. महामानवांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रासाठी अशी घटना अशोभनीय आहे. अशा घटना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारचे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश स्पष्ट करतात. त्यामुळे राज्य सरकारने या घटनेला गांभीर्याने घ्यावे आणि असे कृत्य करणाऱ्यांना तात्काळ अटक करावे. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, बीड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने लक्ष घालून या घटनेतील माथेफिरू समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी. तसेच यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी एसएफआय बीड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा