Breakingकोरोना योध्या आशा कर्मचाऱ्यांना सामाजिक योगदानातून 4 लाख रुपयांची दिवाळी भेट

अकोले : कोरोना काळात जीवाची पर्वा न करता फ्रंट वारीयर म्हणून भूमिका बजावणाऱ्या अकोले तालुक्यातील आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुमारे चार लाख रुपयांच्या सामाजिक योगदान निधीतून अनोखी दिवाळी भेट देत आशा कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव केला. अकोले येथील अहमदनगर जिल्हा बँकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील सुमारे 400 आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी एक हजार रुपये, दोन एन 95 मास्क व एक लिटर सॅनिटायजर असे सुरक्षा किट चे यावेळी वाटप करण्यात आले.


जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर व अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी हा निधी संकलित करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. 


कोरोना काळात सहकारी संस्था, पतसंस्था, कारखाना, दूध संघ व व्यापारी मित्रांनी पुढे येत सामाजिक निधी संकलित करावा व तो कोरोना योध्ये व कोरोना सेंटर, कोरोना हॉस्पिटलमध्ये सुविधा उभारण्यासाठी वापरावा असे आवाहन डॉ. अजित नवले व विनय सावंत यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आशा कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव करत ही दिवाळी भेट या निधीतून उपलब्ध करून देण्यात आली.


जिल्हा बँकेच्या सभागृहात यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत यांनी केले. सदाशिव साबळे यांनी सूत्रसंचालन केले. सीताराम पाटील गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात गटप्रवर्तक भारती गायकवाड व सुनीता पथवे, आशा कर्मचारी संगीता साळवे, उषा अडांगळे यांनी मनोगते व्यक्त केली व  सामाजिक भावनेतून आशांना दिवाळी भेट दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. आशा प्रकल्पाच्या तालुका समूह संघटक रोहिणी भांगरे यावेळी उपस्थित होत्या. तालुका आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे यांचेही सहकार्य कार्यक्रमासाठी लाभले.


किसान सभेचे नामदेव भांगरे, देवराम मधे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. जिल्हा बँकेचे कर्मचारी व अगस्ती पतसंस्थेचे कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. जिल्हा बँकेचे कर्मचारी प्रतिनिधी सुभाष घुले, बाळासाहेब कोटकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकर, अनिकेत चौधरी, शाम वाकचौरे यावेळी उपस्थित होते. आशा प्रमाणेच तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, घर कामगार, अर्धवेळ परिचर, बांधकाम कामगार, आहार कर्मचारी, विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार, वृद्ध यांची दिवाळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात गोड करण्यासाठी सर्वांना बरोबर घेत प्रयत्न करणार असल्याचे यावेळी डॉ. अजित नवले व विनय सावंत यांनी सांगितले.


कोरोना महामारीत जनतेला आणखी कशाप्रकारे मदत करता येईल यासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याची भावना सीताराम गायकर, बाळासाहेब भोर व महेश नवले यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा