Breaking

आदिवासी भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथील वेळ बदलण्याची किसान सभेची मागणी

घोडेगाव : येथील ग्रामीण रुग्णालय हे आसपासच्या परिसरातील तसेच आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागासाठी आरोग्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. सद्यस्थितीत  ग्रामीण रुग्णालयाची वेळ ही सकाळी ९. ते दुपारी १२.३० अशी आहे. मात्र आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील गावे ही रुग्णालयापासून ६० ते ७० किलोमीटर लांब आहेत व या वेळेमुळे आदिवासी भागातील रुग्णांना घोडेगावला येण्यास उशीर होतो व तोपर्यंत रुग्णालयात केस पेपर देणे बंद झालेले असते. व परिणामी अनेक रुग्णांची गैरसोय होते.


रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात जावे लागते, तर काही रुग्णांना उपचार न घेता पुन्हा घरी जावे लागते. आदिवासी भागातील रुग्णांची गैरसोय टाळावी व रुग्णांना वेळेत योग्य ते उपचार मिळावेत यासाठी सकाळची ९ ते दुपारी १२.३० वा. ही वेळ बदलून ती सकाळी १० ते दुपारी १.३० वा अशी करण्यात यावी हि प्रमुख मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.


तसेच सायंकाळची वेळ घोडेगाव व आसपासच्या परिसरातील रुग्णांना सोयीस्कर व फायद्याची असल्याने ती सायंकाळची वेळ आहे तशीच ठेवावी. असे ही संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या मागणीचे निवेदन अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने रुग्णालयाच्या अधीक्षक यांना देण्यात आले.


यावेळी किसान सभेचे कॉ. राजु घोडे, कॉ.अशोक पेकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, DYFI या युवा संघटनेचे कार्यकर्ते महेश गाडेकर, गणेश काटळे, सागर पारधी, SFI संघटनेचे अविनाश गवारी हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा