Breaking

शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याची किसान सभेची मागणी; वाई फाटा येथे रास्ता रोको आंदोलन


माहूर (नांदेड) : शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या माहूर तालुका कमिटीच्या वतीने वाई फाटा येथे आंदोलन करण्यात आले.


किसान सभेने म्हटले आहे की, श्री क्षेत्र माहुर परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र या अंतर्गत केवळ उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना मिळेल व बहुसंख्य शेतकरी भरपाई पासून वंचित राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने भिजून खराब झालेल्या पिकाचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची तातडीने काढणी मळणी केली. पावसाने भिजलेला, काळवंडलेला हा निकृष्ट शेतमाल सावलीला नेण्याचा प्रयत्न केला. परिणामी नुकसान होऊनही शेतकऱ्यांची ही पिके आज उभी दिसत नसल्याने या नुकसानीची नोंद केली जात नसल्याने शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे मोठ्या प्रमाणात भरपाई पासून वंचित राहत आहेत. फळ पिकांच्याबाबत केवळ फळे लागलेल्या बागांच्याच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या फळावर न आलेल्या बागांचे राज्यात अतोनात नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने डाळिंब, संत्री, मोसंबी, आंबे उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित रहात आहेत. अति पावसाने ऊस व कपाशीचेही मोठे नुकसान झाल्याने ही पिकेही धोक्यात आली आहेत.

तहसील व तालुका प्रशासन बाधावर न जाताच परस्पर नुकसान न झाल्याचे अहवाल सादर केला असल्याने माहुर तालुक्यातील शेतकरी अनुदानपासून वंचित राहणार आहेत. तेव्हा परत व योग्य अहवाल सादर करावा, एकरी पंचवीस हजार रूपये मदत जाहीर करण्यात यावी, पंचनाम्यांचा हा गोंधळ थांबवावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी किसान सभेने केली.

आंदोलनात जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम जिल्हा सचिव, कॉ. किशोर पवार, कॉ. डॉ . बाबा डाखोरे, तालुका सचिव राजकुमार पडलवार, अमोल आडे, कैलास भरणे, राजु राठोड, परसराम पारडे, कादर खान, चंद्रभान निलेवाड, वसंत राठोड, एसएफआय चे संघटनेचे प्रफुल्ल कवुडकर, विशाल नरवाडे, सिटु संघटनेचे कालिदास सोनुले आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा