Breaking
पिंपरीतील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिक हवालदिल माकपची टीका

पिंपरी  : शहरात नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवस आड पाणी पुरवठा सुरु आहे. अतिरिक्त ५० एम एल डी पाणी उपलब्ध झाल्यानंतर सदरचा पाणी पुरवठा नियमित होईल तो पर्यंत आणखी एक वर्ष एक दिवस पाणी पुरवठा केला जाईल असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केल्यामुळे नागरिक हवालदिल झालेले आहेत.


पवना धरण १०० टक्के भरलेले आहे. त्यामूळे प्रशासनाच्या या भूमिकेवर नागरिक संतप्त आहेत. पाण्याची ३५% टक्क्यांहून जास्त गळती आहे, वितरण व्यवस्थेत सावळा गोंधळ आहे. शहरातील अनेक प्रभागात विकास कामाचा धडाका लावून सर्वत्र खोदाई आणि पाईपलाईन तुटण्याचे प्रकार वाढले आहेत.


क्षेत्रीय प्रभाग अधिकारी यांच्या असंवेदनशील कारभारामुळे स्मार्ट सिटी, रस्ते विकास, विद्युत विभाग  इ विविध प्रशासकीय कार्यालयाचा एकमेकांशी समन्वय नसल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. शहरातील टॅंकर लॉबीला सुगीचे दिवस आले आहेत. लाखो रुपयांची कर्जे काढून सदनिका घेतलेल्या हजारो सोसायटी धारकांना टँकरचे पाणी घ्यावे लागत  आहे, यासाठी येणारा खर्च वाढत आहे. हि समस्या अतिशय तीव्र आहे, अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सोसायट्यांच्या टाक्या भरायला किमान एक तास पूर्ण दाबाने पाणी पुरवठा पाहिजे. शहरात ५० आणि त्यापेक्षा जास्त सदनिका असलेल्या सोसायट्यांची संख्या जास्त आहे.


आधीच विजेचा खेळ खंडोबा झाला आहे. त्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ होत आहे. २७ लाख लोकसंख्येला पाणी कसे पुरवावे, गळती ओळखण्यासाठी आधुनिक यंत्रे आहेत त्याचा वापर करावा, जलव्यवस्थापन तज्ज्ञांची समिती नेमून कमी वेळेत योग्य पाणीपुरवठा कसा करावा यासाठी मुंबई ठाणे महापालिकेचा आदर्श घ्यावा. जलवाहिन्या आणि पंपिंग सेंटरच्या नियमित मेंटेनन्ससाठी अनुभवी यंत्रणा असावी इ विविध मागण्यांसाठी २०१९ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने आयुक्तना निवेदन दिले होते. परंतु मनपा प्रशासन संवेदनशील नाही. मंगळवारी (दि.२७) रोजी आयुक्तांना वाघोली जलशुद्धीकरण प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मिळेपर्यंत एक दिवस आड पाणी पुरवठा अजून वर्षभर राहील? हि भूमिका अतिशय चुकीची असल्याचे माकपने म्हंटले आहे.


धरणातून मिळणारे पाणी तुम्हाला व्यवस्थित पुरवता येत नाही, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना अतिशय त्रास होत आहे. बेकायदेशीर पाणी उपसा, पिण्याच्या पाण्याचा उपयोग सामान्य जनतेसाठी प्रथम करावा. शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या खाजगी टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .हे टँकर कोणाचे आहेत? हे जनतेला माहित आहे असे म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने मागण्या केल्या आहेत की, 

१) शहरातील एक दिवस आड पाणी पुरवठा धोरण रद्द करावे.

२) सकाळी आणि संध्याकाळी किमान तीन तास पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा. त्यामुळे सोसायट्या आणि निवासी क्षेत्रात पाणी समस्या निर्माण होणार नाही.

३) मनपाने स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा करावा.

४) पाण्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करावी.

आदी मागण्या महानगर पालिकेकडे करण्यात आल्या आहेत.


या वेळी गणेश दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, सतीश नायर, सुकुमार पोन्न्पन, अमिन शेख, किसन शेवते, अविनाश लाटकर, अपर्णा दराडे, सचिन देसाई, स्वप्नील जेवळे, निर्मला येवले, बाळासाहेब घस्ते, संजय ओहोळ, ख्वाजा जमखाने, सुषमा इंगोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा