Breaking
सदोष पंचनामे थांबवा, शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या ; किसान सभेचा वाई फाटा येथे रास्ता रोको

माहूर : परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र या अंतर्गत केवळ उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना मिळेल व बहुसंख्य शेतकरी भरपाई पासून वंचित राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


परतीच्या पावसाने भिजून खराब झालेल्या पिकाचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची तातडीने काढणी मळणी केली. पावसाने भिजलेला, काळवंडलेला हा निकृष्ट शेतमाल सावलीला नेण्याचा प्रयत्न केला. परिणामी नुकसान होऊनही शेतकऱ्यांची ही पिके आज उभी दिसत नसल्याने या नुकसानीची नोंद केली जात नसल्याने शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे मोठ्या प्रमाणात भरपाई पासून वंचित राहत आहेत. फळ पिकांच्याबाबत केवळ फळे लागलेल्या बागांच्याच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या फळावर न आलेल्या बागांचे राज्यात अतोनात नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने डाळिंब, संत्री, मोसंबी, आंबे उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित रहात आहेत.


अति पावसाने ऊस व  कपाशीचेही मोठे नुकसान झाल्याने ही पिकेही धोक्यात आली आहेत. तहसील व तालुका प्रशासन बांधावर न जाताच परस्पर नुकसान न झाल्याचे अहवाल सादर केला असल्याने माहुर तालुक्यातील शेतकरी अनुदान पासुन वंचित राहणार आहेत तेव्हा परत व योग्य अहवाल सादर करावा. व   एकरी पंचवीस हजार रूपये मदत जाहीर करा. पंचनाम्यांचा हा गोंधळ थांबवावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी किसान सभा माहुर तालुका कमेटी करीत वाई फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


या वेळी जिल्हा सचिव काॅ. शंकर सिडाम, किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण, डाॅ. बाबा डाखोरे, तालुका सचिव राजकुमार पडलवार, अमोल आडे, कैलास भरणे, राजु राठोड, परसराम पारडे, कादर खान, चंद्रभान निलेवाड, वसंत राठोड विद्यार्थी संघटनेचे प्रफुल्ल कवुडकर, विशाल नरवाडे सिटुचे कालिदास सोनुले सह इतर कार्यकर्ते हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा