Breaking

ऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता ! शरद पवारांच्या उपस्थितीत होणार बैठक


पुणे : वेतनवाढीसह अन्य मागण्यांना घेऊन गेल्या २० दिवसांपासून ऊसतोड कामगार, मुकादमांचा संप सुरु आहे. आजपर्यंत झालेल्या बैठका निष्फळ ठरलेल्या असताना उद्या ( दि. २७ ऑक्टोबर) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.


उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची चिन्हे आहेत. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार पणनमंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, साखर संघाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष तसेच ऊसतोड कामगार संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

ऊसतोडणी कामगारांसाठी सरकारने घोषित केलेल्या कल्याणकारी महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करावे, सन २०२० - २१ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसतोड व वाहतूक कामगार मुकादम ऊस वाहतूकदार यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र व सेवा पुस्तिका देण्यात यावे, या महामंडळासाठी निधी उभारण्यासाठी राज्यातील साखर उत्पादनावर किमतीच्या १ टक्का इतका उपकर लागू करावा, ऊस तोडणी व वाहतूक कामगारांना बस पाळी भत्ता सुरू करा, बस पाळी दिवसाचे बैलगाडीचे भाडे कारखान्यांनी रद्द करावे, ऊस तोडणी कामगारांना लागू असलेल्या पद्मश्री डॉ विखे पाटील अपघात विमा योजनेअंतर्गत प्रत्येक कामगारांना पाच लाख रुपयांचा तसेच बैलजोडीचा एक लाख रुपयाचा तसेच बैलगाडी व झोपडी याचा विमा उतरवावा विम्याचा प्रिमियम चे पैसे ५० टक्के साखर कारखान्यांनी व ५० टक्के राज्य सरकारने भरावेत, स्थलांतरित ऊस तोडणी वाहतूक कामगारांना कामावर जाताना सहा महिन्याचे रेशन एकदम द्यावे किंवा साखर कारखान्याच्या ठिकाणी रेशनवरील धान्य पुरवठा करण्यात यावा, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक मध्ये जाणाऱ्या ऊस तोडणी व वाहतूक कामगारांची नोंदणी करून आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याप्रमाणे सुविधा पुरवाव्यात, ऊसतोडणी व वाहतूक कामगारांना साखर कारखान्यांना कडून मोफत वैद्यकीय उपचार सुविधा आणि बैलांना खुरकतावरील लस द्यावी, ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या मुलामुलींसाठी त्यांच्या गावी निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात यावे, आदी मागण्यांना घेऊन ही बैठक पार पडणार आहे.

ऊसतोड कामगारांचे नेते डॉ. डी. एल. कराड, डॉ. सुभाष जाधव यांनी ऊसतोड कामगारांच्या संपात शरद पवारांनी हस्तक्षेप करावा, तसेच शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा