Breaking

ग्रामविकासाला नोकरदारांची साथ


परिवर्तन ग्रुप इंगळूनचे ग्रामस्थ व किसान सभेने व्यक्त केले आभार


जुन्नर : नोकरदार मंडळीकडून गावासाठी अनोखी भेट दिली. इंगळून गावातील युवकांनी किसान सभेच्या मार्गदर्शनाने गावातील मजुरांना मनरेगा कायद्याची माहिती दिल्याने गावामध्ये मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवडीचे काम चालू झाले. इंगळून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील २५ ते ३० मजुरांना रोजगार मिळाला.

गावामधील युवकांनी एकत्रित येऊन केलेल्या विधायक कामगिरीमुळे रस्त्याच्या दुतर्फा १ हजार हून अधिक वृक्ष लावले गेले. गावातील युवकांनी पुढाकार घेवून केलेल्या कार्याचे गावातीलच नोकरदार यांनी कौतुक केले. रोजगार हमीमध्ये बिहार पॅटर्न अंतर्गत पुढील ३ वर्ष वृक्ष संगोपनासाठीची १४ लक्ष ९३ हजार रुपयांची तरतूद आहे. 

यातून पुढील ३ वर्षांसाठी ५ हजार हून अधिक मनुष्य दिवसांचा रोजगार गावातील मजुरांना उपलब्ध झालेला आहे. यामध्ये वृक्षांना काटेरी कुंपण करावे लागणार असल्याने इतर वृक्षांची तोड होणार होती. एका बाजूला वृक्ष लावायचे आणि ते जगविण्यासाठी दुसरे वृक्ष, झुडपे तोडायची हे गावातील युवकांना पटले नाही. यासाठी या युवकांनी परिवर्तन नगर ग्रुप इंगळून यांच्याकडे आपली समस्या मांडली. 

परिवर्तन ग्रुप इंगळून चे गावातील नोकरदार मंडळींने गावातील विविध समस्यांवर विचार विनिमय करून त्या सोडविण्यासाठी आर्थिक मदतीसह विद्यार्थी युवकांना ग्रामस्थांना सातत्याने मार्गदर्शन करून गाव विकासात सातत्याने सहभाग घेण्याऱ्या या मंडळींनी युवकांना अधिकची प्रेरणा मिळावी आणि लावलेल्या रोपांना संरक्षण करण्यासाठी इतर वृक्ष झुडपे यांची तोड होऊ नये म्हणुन ट्री गार्ड देण्याचा निर्णय घेतला.

नोकरदारांनी देणगी रूपाने ३०,७०० रुपयांची आर्थिक मदत जमा करून ३०० हून अधिक ट्री गार्ड खरेदी करून दिले. यामुळे रोपांना चांगल्या प्रकारचे संरक्षण मिळून रोपांची वाढ होण्यास मदत होणार आहे.
 
यामुळे युवकांना नक्कीच प्रेरणा मिळाली आहे. नोकरदार मंडळीच्या या अनोख्या भेटीमुळे भारावून गेलेल्या युवकांनी या ग्रुपचे आभार मानले आहेत. तर किसान सभा जुन्नर तालुका समितीने अशा प्रकारे विधायक काम करून गावाच्या विकासासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रुपचे आभार मानून इतर गावातील जाणकारांनी आदर्श घेण्याचे आवाहन या माध्यमातून केले आहे. 

भविष्यात इंगळून गावातील एकही मजूर रोजगारासाठी गावातून बाहेर जाणार नाही. मागेल त्याला, मागेल तेव्हा मागे तितके दिवस काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्वासन किसान सभेने दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा