Breakingपायी मोर्च्याची फलनिष्पत्ती; हिवरे तर्फे मिन्हेर गावात रोजगार हमीच्या कामांना सुरुवात

हिवरे तर्फे मिन्हेर (जुन्नर) : मागील अनेक दिवसांपासून गावातील मजुरांकडून सातत्याने रोजगार हमीच्या कामांची मागणी होत होती. गट विकास अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता न दिल्याने कामे चालू होत नव्हती. सरपंच आणि ग्रामपंचायत यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही शेल्पवर कामे मंजूर होत नव्हती त्यामुळे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी साडे चार तास गट विकास अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयातच घेराव घातला होता. 


गट विकास अधिकारी यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे किसान सभेने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यासाठी शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असा पायी मोर्च्या केला. या वेळी जिल्हा प्रशासनाकडून योग्य आश्वासन संघटनेला देवून कामे चालू करण्याचे आदेश दिले. यामुळे हिवरे तर्फे मिन्हेर गावात आज रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवडीला सुरुवात झाली.


आज सरपंच बुधाजी गवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हिवरे तर्फे मिन्हेर गावामध्ये रोजगार हमीच्या कामांना सुरुवात करण्यात आली. त्यावेळी मागेल त्याला काम देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच गवारी यांनी दिले.


यावेळी किसान सभा जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी योजनेबाबत उपस्थित ग्रामस्त आणि मजूर यांना मार्गदर्शन केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गवारी, विश्वनाथ निगळे, राघू गवारी, लक्ष्मन निगळे, विश्वास वाघमारे, अनिल जावळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा