Breaking




सावधान : व्हाट्सअप स्टेटस ठेऊन 500 रुपये कमवण्याच्या नादात असाल तर हे वाचाच

कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून व्हॉटस्अॅप स्टेट्सवर एक लिंक मोठ्या प्रमाणावर अपडेट होत आहे. त्यात व्हॉटस्अॅपवर स्टेट्स ठेवून पैसे कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. त्यासाठी व्यक्तिगत काही माहिती या लिंकव्दारे भरून घेतली जात आहे. विशेष म्हणजे अनेक जणांनी या लिंकवर माहिती भरून व्हॉटस्अॅप स्टेट्स ठेवल्याचे प्रकार हि समोर आले आहेत. मात्र, या बाबत सायबर सेल मात्र अनभिज्ञ आहे असल्याचे हि दिसून आले आहे.


बेरोजगारी आणि शॉटकटने पैसे कमविण्याच्या नादात नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवले जाते त्यांना अनेक जण त्याला बळी पडतात त्यातच अनेकांची लूट होते. 


हल्ली प्रत्येक जण आपल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंट ट्रांसफर करण्यासाठी बॅंक लिंक असलेल्या मोबाइल नंबरशी विविध अॅपची जोडणी करतात. तसेच तोच नंबर नियमित वापरात असल्याने त्यावर व्हॉटस्अॅप ही सुरू करतात. यातून आपली व्हाट्सअप सह आपली वैयक्तिक माहिती लीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


काय आहे या लिंक मध्ये- 


"मराठी ऑनलाईन वर्क" या नावाने हि बनावट वेब साईट आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटसमधून पैसे कमवू शकता अशी जाहीरात देत स्वतःची व्यक्तिगत माहिती भरण्यासाठी सांगितले जाते. या लिंकमध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत. स्वतःचा मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी भरल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटस शेअर करण्यासाठी एक आयकॉन येतो. शेअर केलेले स्टेटस जर तीस पेक्षा अधिक जणांनी पाहिले तर ५०० रुपयांपर्यंत कमाई करता येईल असे त्या लिंकवर नमूद केले आहे. या प्रलोभनाला आतापर्यंत हजारो जण बळी पडले आहेत. त्यामुळे हा सायबर क्राईमाची नवी पद्धती तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या संदर्भात सायबर सेलच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लिंकवर व्यक्तिगत माहिती भरताना खात्री करा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.


या बाबतील सत्य जाणून घेण्यासाठी "महाराष्ट्र जनभूमी"ने कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही गोष्टीवर कुणी विश्वास ठेऊ नये या भूलथापा असतात, अशा पद्धतीने कुणालाही पैसे मिळणार नाही. यातून तुमची बदनामी तसेच तुम्हाला ब्लॅकमिल केले जाऊ शकते. या माहिती वरून तुमच्या नावाने कर्ज काढले जाऊ शकते किंवा तुमचे बँक खाते हॅक केले जाऊ शकते यासाठी त्या माहितीचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती कुठेही देऊ नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा