Breaking
पोलिस अधिकारी ठरतायेत अतिरिक्त; ऐका बदली झालेल्या अधिकाऱ्यांची व्यथा

नागपूर : सरकारने अलिकडे शेकडो पोलीस अधिकाऱ्यांच्या राज्यभर बदल्या केल्या आहेत. पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाने जिथे बदली केली जातेय, तेथे अधिकाऱ्यांची खरोखर गरज आहे का याचा तपशील न घेता कागदी आणि इमेलद्वारे बदलीचे कारकुनी हुकूम काढले. ज्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली, त्या ठिकाणी सदर निरीक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात आल्याचे चित्र आहे.


महाराष्ट्रातील त्या त्या जिल्हा पोलीस आयुक्तालयांने आता अधिकाऱ्यांची गरज नाही, तशी मागणी केलेली नाही. त्यामुळे नागपूर सारख्या ठिकाणी बदली करण्यात आलेले निरीक्षक बिनपगारी ठरले आहेत.


आम्हाला कामावर रुजू करून घ्या, अशा विनवण्या ते करत आहेत. संपूर्ण वेळ आयुक्त कार्यालयात त्यांना विनवणीसाठी थांबावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. प्रशासकीय कालावधी पूर्ण झाल्यामुळे आणि बदलीसाठी विनंती अर्ज केलेले अनेक पोलीस निरीक्षक विनावेतनामुळे हवालदिल झाले आहेत. त्यांची दिवाळी आणि कौटुंबिक जीवनात आर्थिक चणचण सुरु झाली आहे.


बदली करताना मंजूर पदे आणि सद्यस्थितीत पदे याचा लेखाजोखा न घेतल्यामुळे महासंचालक कार्यालायातून मनस्ताप निर्माण करणारे बदलीचे आदेश काढण्यात आली असल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये आमदार, खासदार यांचे राजकीय हस्तक्षेप होतात आणि गरज नसलेल्या ठिकाणी निरीक्षकांची अर्थपूर्ण बदली होत असते, अशी चर्चा आता अधिकारी करु लागले आहेत.


अतिरिक्त निरीक्षक रुजू करण्यात आल्यामुळे अलीकडे प्रशासकीय गोंधळ वाढला आहे. शासनाकडे बदलीचे हक्क असले तरी अशा प्रकारच्या आदेशामुळे कार्यक्षम आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. बदली झालेले अनेक अधिकारी सध्या बिन पगारी आणि फुल अधिकारी ठरले आहेत. आता त्यांना रुजू करुन घेण्याची प्रतिक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा