Breaking

विशेष लेख : विश्लेषण - बिहार विधानसभा निवडणूकीचे - डॉ. संतोष संभाजी डाखरे

  अत्यंत चुरशीच्या झालेल्या बिहार विधानसभा निवडनणूकीमध्ये अखेर एन.डी.ए.ने बाजी मारली. नाट्यपूर्ण अशा मतमोजणीमध्ये एन.डी.ए.ला (बीजेपी, जेडीयू व अन्य) १२५ तर महागठबंधनला (राजद,कॉंग्रेस व डावे) ११० जागा प्राप्त झाल्या. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेमध्ये सत्तासंपादनासाठी आवश्यक असलेला १२२ चा ‘मॅजिक फिगर’ गाठण्यात बीजेपी आणि नितीश कुमार यांच्या युतीला यश आल्याचे दिसत आहे. मागील पंधरा वर्षापासूनचा राजकीय वनवास संपविण्याकरिता कंबर कसलेल्या तेजस्वी यादवांच्या राजदला पुन्हा एकदा सत्तेने हुलकावणी दिली आहे.


    बिहारमध्ये यावर्षी सत्तांतर निश्चित होणार याबाबत अनेक राजकीय विश्लेषकांचे एकमत होते. नितीश कुमार यांच्या सलग पंधरा वर्षाच्या राजवटीविरुद्ध असलेली ‘अॅंटी इन्कमबन्सी’ ही त्यांना घेऊन डूबेल असेच वातावरण बिहारमध्ये होते.

तेजस्वी यादव यांचा झंझावात, त्यांच्या सभांना उसळणारी गर्दी, त्यांना तरुण वर्गांचा मिळणारा पाठिंबा हे सर्व सत्ता बदलाचे संकेत देणारेच होते. निकालापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अनेक वाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’ मधूनही महागठबंधनलाच स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होत होते. असे असतानाही महागठबंधन अपेक्षित यश प्राप्त करू शकले नाही. निकालापूर्वीच्या अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तपत्रांमधील लेखांचे आशय हे बिहारमधील बदलाच्या संदर्भातच होते. त्यामुळेच बिहारचा निकाल हा अनेक राजकीय पंडितांना, विश्लेषकांना धक्का देणारा ठरला, यात वादच नाही. नेमकं हे असं का घडलं ?


    बिहारमधील मागील तीस वर्षाच्या राजकारणाचा आढावा घेतल्यास १९९० ते २००५ पर्यंत लालूप्रसाद यादव यांचा राजदची तर २००५  ते २०२० पर्यन्त नितीशकुमारांच्या जेडीयूची सत्ता होती. म्हणजेच लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे बिहारच्या राजकारणातील मध्यवर्ती केंद्र राहिले आहे. हे दोन्ही नेते ओबीसी समुदायातील आहे. मात्र त्यांच्या राजकारणाची पद्धत ही वेगळी राहिली आहे. लालूंनी केवळ यादवांना केंद्रभूत मानून ओबीसींचे राजकारण केले तर नितीश कुमारांनी यादवेतर ओबीसींना केंद्रभूत मानून राजकारण केले. लालूंच्या ओबीसी राजकारणामूळे बिहारमधील उच्चवर्णीयांची नाराजी त्यांना ओढवून घ्यावी लागली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लालूंना मध्यंतरी सत्ता सोडावी लागली आणि सत्तासूत्रे त्यांच्या पत्नी ‘राबडीदेवी’ यांच्याकडे सोपवावी लागली. त्या काळात यादवांचे शासन-प्रशासनामधील महत्त्व प्रचंड वाढले. अन्य प्रवर्गाला कमी लेखण्यात येऊ लागले. गुन्हेगारी वाढली. त्यामुळेच या काळाचा उल्लेख ‘जंगल राज’ असा करण्यात येतो.


    या सर्वांचा परिणाम २००५ मधील निवडणूकीत दिसून आला. यामध्ये नितीश कुमार आणि बीजेपी यांच्या युतीने बाजी मारली. २०१० मध्येही नितीश कुमारांचीच सत्ता आली. नितीश कुमारांची प्रतिमा बिहारमध्ये ‘सुशासन बाबू’ अशी होत असताना ‘सेक्युलर राष्ट्रीय नेतृत्व’ म्हणूनही त्यांच्याकडे बघण्यात येऊ लागले. त्यामूळे नितीश कुमारांच्याही राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा उंचावल्या. दिल्ली त्यांना खुणावू लागली. मात्र २०१४ लोकसभा निवडणुकांसाठी एन.डी.ए.ने ‘नरेंद्र मोदी’ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने नितीश कुमारांच्या राष्ट्रीय स्वप्नांना सुरुंग लागला आणि ते एनडीएमधून बाहेर पडले.


२०१५ च्या निवडणूकीत नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्या आरजेडीसोबत युती करून निवडणूक लढवली. सत्तेतही आले. मात्र दीड वर्षातच लालूंची साथ सोडून परत त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश केला आणि बीजेपीच्या साथीने सरकार स्थापन केले. त्यामुळे लालूप्रसाद नेहमी नितीशकुमारांचा उल्लेख ‘पलटूराम’ असे करतात.


    या निवडणूकीत राजद ७५, जनता दल संयुक्त ४३, बीजेपी ७४, काँग्रेस १९, डावे १६, विकासशील इन्साफ पक्ष ४, हिंदुस्तान अवाम मोर्चा ४, लोक जनशक्ती पक्षा १, एआयएमआयएम ५, बीएसपी १ व अपक्ष १ असे बलाबल राहिले. सर्वात मोठा पक्ष म्हणून राजद समोर आला. तर दुसरा मोठा पक्ष म्हणून बीजेपीने बाजी मारली. या निवडणूणुकीत सर्वात मोठा फटका बसला तो नितीश कुमारांच्या पक्षाला २०१५ मधील ७१ जागांवरून हा पक्ष ४३ वर खाली आला. त्यामूळेच बीजेपीच्या मुख्यमंत्रीपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.


    बिहारच्या बीजेपी प्रदेश अध्यक्षांनी हा जनादेश नितीश कुमारांना नसून तो बीजेपीला आहे. त्यामूळे मुख्यमंत्री हा बीजेपीचाच असणार असे स्पष्टीकरण दिले आहे. ७४ जागा प्राप्त केलेला बीजेपी नितीश कुमारांना सहजासहजी मुख्यमंत्रीपद देतील यावर विश्वास करणे कठीण आहे. एक तर अडीच-अडीच वर्षाची भागीदारी किंवा केंद्रात मंत्रीपदाची ऑफर नितीश कुमारांना देण्यात येऊ शकते. बीजेपीची कार्यपद्धती पाहू जाता बिहारसारखे राज्य ते हातातून जाऊ देणार नाही. कारण बिहार, उत्तर प्रदेश सारखे राज्य ज्या पक्षांच्या हातात राहील ते केंद्रात सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतात हा इतिहास आहे.

  

     ही निवडणूक नितीश कुमारांनी जेवढी प्रतिष्ठेची केली होती. त्यापेक्षा कित्येक पट अधिक बीजेपीने केली होती. कारण आगामी काळात पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका आहे. त्यामूळे बिहारमध्ये अपयश पदरात पाडून बंगालच्या निवडणुकांना सामोरे जाणे त्यांना कधीही आवडले नसते. सध्या बीजेपीचे लक्ष पश्चिम बंगालाच आहे. म्हणूनच तर प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये नितीश कुमारांना होणारा विरोध बघता अनेक पोस्टर्स, बॅनरवरून नितीश कुमारांचे चित्र गायब करण्यात आले होते. त्या जागी फक्त मोदी आणि मोदीच दिसू लागले. नंतरच्या टप्प्यातील प्रचाराला लोकसभा निवडणुकीचे स्वरूप आल्याचे बघावयास मिळाले. तेजस्वी यादव यांनी निरक्षरता, बेरोजगारी, कुपोषण, भ्रष्टाचार अशा मूलभूत मुद्द्यांवर सभा गाजवायला सुरुवात केली असतानाच बीजेपी आणि मोदींनी राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक हे मुद्दे पुढे केलेत.

लालू यादव यांच्या ‘जंगल राजचा’ उल्लेखही प्रत्येक सभेत करायला ते विसरले नाही. या मुद्द्यांच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करण्यात बीजेपी बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येते.


    आजवर बिहारमध्ये लहान भावाच्या भूमिकेत असलेला बीजेपी आता मोठा भाऊ म्हणून उदयास आला आहे. यामध्ये स्व. रामविलास पासवानच्या ‘लोक जनशक्ती पक्षाची’ भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. कारण लोजपा या निवडणुकीत बीजेपी आणि नितीश कुमारांसोबत न लढता स्वतंत्रपणे लढला. फक्त जेडीयूच्या विरोधातच त्यांनी उमेदवार दिले. निकालानंतरची आकडेवारी बघितल्यास लोजपामूळे जेडीयूच्या ३५ ते ३६ जागा पडल्यात. या सर्व प्रकाराला बीजेपीची फूस होती हे लपून राहिलेले नाही.


    काँग्रेसची हाराकिरी याही वेळेस दिसून आली. आपण जिंकणारच नाही. या आविर्भावात काँग्रेस बिहारमध्ये दिसून आली. तेजस्वी यादव यांचा झंझावात चालू असताना काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वानेही त्यास साथ दिली असती तर दहा पंधरा जागा सहज वाढल्या असत्या. काँग्रेसच्या तुलनेत डाव्यांचे प्रदर्शन मात्र चांगले राहिले. ओवेसींच्या एमआयएमनेही काँग्रेसच्या हक्काच्या मुस्लिम मतांना अनेक ठिकाणी सुरुंग लावून एक प्रकारे बीजेपी व नितीश कुमारांचे काम सोपे केले. असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.


    ही माझी शेवटची निवडणूक आहे अशी अंतिम टप्प्यात नितीश कुमार यांनी मतदारांना घातलेली भावनिक साद आणि मला बिहारच्या विकासासाठी नितीश कुमारांची गरज आहे, हे नरेंद्र मोदी यांचे आवाहन एनडीएच्या मतांमध्ये भर घालण्यात कारणीभूत ठरल्याचे म्हणता येईल.


    बीजेपीने या प्रचारात मोदींसह अर्धेअधिक मंत्रिमंडळ, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री अशी फौज मैदानात उतरविली होती. दुसरीकडे महागठबंधनची मदार एकट्या तेजस्वी यादवावर होती. अशाही परिस्थितीत त्यांनी राजदला राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनविला. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शब्दात ते खर्‍या अर्थाने ‘मॅन ऑफ द मॅच ठरले’. तेजस्वी यादवच्या अथक प्रयत्नामूळेच ही निवडणूक एकतर्फी न होता काट्याची राहिली हे कोणीही मान्य करेल.


    बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट असतानाही अडगळीत पडलेल्या काँग्रेसच्या दिग्विजय सिंगांनी नितीश कुमारांना बीजेपी सोडून महागठबंधनमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला आहे. बीजेपीने नितीश कुमारांच्या मुख्यमंत्रीपदात काही विघ्न आणल्यास दिग्विजय सिंगांच्या या प्रस्तावांचा ते दबावतंत्र म्हणून वापर करतील हे निश्चित आहे. नितीश कुमार आणि बीजेपीने प्रशासनावर दबाव टाकून मतमोजणीत घोळ केल्याचा आरोप आरजेडीने केला आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करून चौकशीची मागणीही केली आहे. यातून आता काहीही निष्पन्न होणार नाही. हे निश्चित.


   यामध्ये एक बाब प्रकर्षाने जाणविते ती म्हणजे, अलीकडे निवडणुका या वीज, पाणी, रोजगार, शिक्षण अशा मूलभूत बाबींवर लढविल्या न जाता त्या धार्मिक ध्रुवीकरण व अन्य निरर्थक मुद्यांवर लढविल्या जातात. हे बिहार निवडणुकीने परत एकदा अधोरेखित केले आहे.


 क्रिकेटपटू म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या तेजस्वी यादव यांना राजकीय मैदानावरील आपल्या डावाची सुरुवात करण्याकरिता आणखी पाच वर्ष तरी वाट बघावी लागणार असे दिसत आहे.


 

- डॉ. संतोष संभाजी डाखरे

- ८२७५२९१५९६


(लेखक हे गडचिरोली येथे प्राध्यापक आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा