Breaking

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची पुनर्रचना सरकारने करावी - डॉ. अमोल वाघमारे


पुणे : कोरोना काळात सुरुवातीच्या ३ महिन्यात १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूची चर्चा झाली, त्यावर सरकारने अतिशय चांगले उपाय केले, मात्र अचानक वाढलेल्या शेतकरी आत्महत्येची चर्चा झाली नाही. कोरोना काळात पुण्याच्या मजूर अड्ड्यावर रोज १५० हुन जास्त ग्रामीण बेरोजगार तोंडाला मास्क लावून कामासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत ताटकळत उभे असायचे, असे मत कृतीशिल सामाजिक कार्यक्रर्त आणि ग्रामीण विकासाचे अभ्यास डॉ. अमोल वाघमारे यांनी व्यक्त केले.


ते मोशी येथून 'आजची ग्रामीण विकासाची अवस्था' या विषयावर ' ऑनलाईन अभ्यास शिबिरात बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, आज ग्रामीण भागातील शेतीच्या मातीचे आरोग्य बिघडले आहे. जलसिंचन, वीजपुरवठा, जनावरांच्या दवाखान्याची दुरावस्था, शेतमालाला अपेक्षित हमीभावाचा अभाव इ. अनेक कारणांमुळे ग्रामीण शेती आणि संपूर्ण समाज आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत आहे, आणि या सर्व बेरोजगारांना त्यांच्या गावात कोणतेही काम राहिले नाही. त्यामुळे जगण्यासाठी ते शहराकडे जात आहेत, तेथेही त्यांची अवस्था वाईट आहे.

स्वातंत्र्याच्या कालखंडात चांगले गुणात्मक बदल शेतीक्षेत्रात झाले होते. मात्र आता ग्रामीण महाराष्ट्रातील अल्पभूधारक, भूमिहीन, आदिवासी,भटक्या समाजाच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव चित्र मूल्यांकन करून तपासावे. 

ग्रामीण भागातील शेती संपन्न झाली तर देशाची अर्थव्यवस्था संपन्न होईल आणि लोकशाही विकसित होईल. परंतु ग्रामीण भागातील जल, जंगल, जमीन यावर भांडवलशाही आणि नफेखोर वित्तीय आक्रमण होत आहे. समृद्धी मार्गासारख्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनी हातातून निघून जात आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील दशकातील वाढलेली बेरोजगारीला काय करणे आहेत? याची चर्चा झाली पाहिजे, असे ही ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने १९७७ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. महाराष्ट्रातील थोर गांधीवादी विचारवंत आणि विधानसभेचे सभापती स्वर्गीय वि. स. पागे यांनी मनरेगा अंतर्गत गावातील विकासाची एकूण २६२ कामे गावातील लोकांकडून करून घ्यावीत. शेती, रस्ते, जलसिंचन, जंगलरक्षण इ. सर्व प्रकारची कामे करून घेणे आणि मागेल त्याला काम स्वयंपूर्ण ग्रामविकासाकरिता ग्रामसभेला अधिकार दिले. तसाच कायदा २००५ साली डाव्या आघाडीने पुरस्कृत केलेल्या काँगेस सरकारने केला. ग्रामीण विकासासाठी सरकारचा अंदाजपत्रकातील कोट्यवधी रुपये त्यासाठी होते. मात्र भ्रष्ट कारभार आणि दिरंगाई मुळे सर्व योजना धुळीस मिळाल्या.

डॉ. वाघमारे यांनी सांगितले की, आम्ही किसान सभेचे काम करताना ग्रामीण भागातील विदारक चित्र पाहायला मिळते. अनेक गावामध्ये चांगले रस्ते नाहीत, आरोग्य सेवा, पाणी आणि वीजपुरवठा आणि एकूण गावाचे भौतिक आणि आर्थिक आरोग्य बिघडलेले दिसते.

समाज धर्म, जात, भाषिक अस्मितेच्या नकारात्मक राजकारणात गुरफटून गेला आहे आणि ग्रामीण एकात्मता नष्ट झाली आहे. संपूर्ण देश आजही ग्रामीण आहे, मनरेगा कायद्याची पूर्ण अमलबजावणी करून महात्मा गांधी यांच्या 'गावाकडे चला' या तत्वाने योजनांची पुनर्रचना करावी. असे केले नाही तर गावे उध्वस्त होऊन शहराकडे लोंढे वाढतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा