Breaking

रेशनिंगवर तातडीने तेल, साखर, डाळी यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा दिवाळीपूर्वी करा - AIDWA


पिंपरी चिंचवड
 रेशनिंगवर तातडीने तेल, साखर, डाळी यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा दिवाळीपूर्वी करा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA) च्या वतीने पिंपरी चिंचवड तहसीलदार श्रीमती गीता गायकवाड, तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
निवेदनात म्हटले आहे की, खुल्या बाजारात खाद्यतेल, डाळी, साखर, शेंगदाणे, चहा इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मागील तीन महिन्यात २८ टक्क्याने वाढलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात रेशनिंगवर फक्त गहू, तांदूळ मिळतात. तेही वेळेवर नाहीत. खुल्या बाजारावर सरकारचे नियंत्रण नाही. पिंपरी चिंचवड शहरात एक लाखाहून जास्त रेशन कार्ड धारक आहेत. कोव्हिडमुळे रोजगार गेले असताना उत्पन्नाचे स्रोत घटलेले आहेत. महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींना सरकारने दिलासा देण्यासाठी खाद्यतेल, साखर, शेंगदाणे, चहा, खोबरे, डाळी, मीठ मसाला इत्यादी वस्तूंचा तसेच अन्न सुरक्षा कायद्यातील सर्व जीवनावश्यक वस्तू रेशनवर द्याव्यात, अशी मागणी जनवादी महिला संघटनेने केली आहे.

सध्या आधार लिंक कार्ड धारकांना एका कार्डामागे १ किलो हरभरा डाळ देण्यास सुरुवात केली आहे आणि साखर, तेल कधी मिळणार याची खात्री नाही. सरकारने डाळी, तेल, साखर या वस्तू माणशी द्यावेत, असे ही निवेदनात म्हटले आहे.

सणासुदीच्या काळात सरकार वेळेवर पुरेसे धान्य, डाळी, साखर, गोडेतेल देत नाही. हजारो घरकामगार, रिक्षाचालक, कंत्राटी कामगार, बहुसंख्य असंघटितांची आर्थिक विवंचना संपलेली नाही. त्यांना मागणी केल्याप्रमाणे दरमहा ७५०० रुपये मासिक अनुदान मिळालेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २००५ नुसार समाविष्ट सर्व जीवनावश्यक वस्तू रेशनवर दिल्या जावे, असे जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा दराडे यांनी म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी परिस्थितीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी अपर्णा दराडे, शेहनाज शेख, गोदावरी गायकवाड, मनीषा जाधव, अनिता खुरपे, द्वारका मुळे, रंजिता लाटकर, निर्मला येवले, सुषमा इंगोले यांनी सरकारकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा