Breaking
नव्या कामगार कायद्यामुळे मजूर स्वस्त - कैलास कदम

 

पिंपरी चिंचवड : कामगारांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा भांडवलदारांच्या हातात देणारे जुलमी कायदे केंद्र सरकारने मागे घेतले पाहिजे, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि परदेशी गुंतवणूकदार यांना या देशातील कामगारांचे कायदे अडथळा ठरत होते. मोदी सरकारने जुने २९ कामगार कायदे रद्द करुन चार सुधारीत कामगार विधेयके संसदेत मंजूर केली. संसदेमध्ये व्यापक चर्चा नव्या विधेयकावर होऊ दिली नाही, अशी टिका ‘इंटक’ चे पुणे जिल्हा अध्यक्ष व पिंपरी चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम यांनी केली.


देशात तीनशे पेक्षा कमी कामगार असलेल्या कारखान्याची संख्या जास्त आहे. देशातील ४० कोटीहून जास्त कामगार कंत्राटी आणि असंघटित आहेत. त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक कल्याण होईल अशा प्रकारच्या सुधारणा केंद्र सरकारने नव्या कायद्यात केल्या असत्या तर आम्ही विरोध केला नसता. मात्र कामगार कंत्राटी म्हणून कामाला लागावा आणि कंत्राटी म्हणून मरावा, अशी तरतूद नव्या कामगार कायद्यात आहे.


कामगाराना स्थाई स्वरूपात पेरोल वर ठेवण्याची  जबाबदारी आता मालकवर्गावर राहिली नसल्यामुळे कामगाराला कोणते कर्ज काढायचे असेल तर बँक आणि वित्तीय संस्था त्याला दारात उभ्या करणार नाहीत.


गेली शंभर वर्षे कामगारांनी लढे करून मिळवलेले सर्व २९ कायदे रद्द करून सरकार कोणाचा विकास करणार आहे हे स्पष्ट झाले आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि संलग्न कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहरात या कायद्याविरोधात जनजागृती करत आहेत. कामगार नेते कैलास कदम पुढे म्हणाले की, लॉकडाउनच्या काळात पिंपरी चिंचवड आणि पुणे औद्योगिक वसाहतीत अनेक कामगारांची पिळवणूक झाली आहे. निर्बंधामुळे हजारो कामगारांना कामावर येता आले नाही आणि नंतर त्यांना कामावरही घेतले नाही. त्या सर्व कामगारांना परत कामावर घ्यावे, त्यांचे पगार द्यावेत तसेच नव्या कामगार कायद्याची अंमलबजावणी न करण्याची महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेचे स्वागत करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.


कामगाराने कंत्राटी म्हणून कामाला लागावे आणि कंत्राटी म्हणून शेवटी मरावे, ही केंद्र सरकारची इच्छा असल्याची टीका त्यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, म्हाळुंगे भोसरी या प्रमुख औद्योगिक वसाहतील हजारो कामगार या नव्या कामगार कायद्यामुळे बेदखल होणार असल्याचे ही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा