Breaking

विशेष लेख : पाकिस्तानात गुरुद्वाराचे नियंत्रण आययसआयकडे - डॉ. संतोष डाखरे

     एखाद्याच्या नावात पवित्र शब्द असला म्हणजे तो पवित्रच असतो, असे नसते. तर तुमची नियतही पवित्र असायला पाहिजे. याची प्रचिती नुकतीच आली आहे.  ‘पाक’ हा शब्द धारण केलेल्या पाकिस्तानचा खरा चेहरा एका नापाक कृतीने जगासमोर उघडकीस आला आहे.


    पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्थित ‘करतारपुर साहिब’ या  शिख समुदायाच्या पवित्र धर्मस्थळाचे व्यवस्थापन ‘पाकिस्तान शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ (PSGPC) कडून काढून ते ‘इवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ (ETPB) नामक मुस्लिम कमिटीला सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नवीन समितीमध्ये शिख समुदायाच्या एकाही सदस्याला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे एका नवीनच वादाला तोंड फुटले आहे.


   फाळणीच्या वेळेस अनेक गुरुद्वार हे पाकिस्तानकडे राहिले. त्यापैकी पंजा सहिब, ननकाना साहिब, डेरा साहेब व करतारपुर साहिब या सारख्या प्रसिद्ध गुरुद्वारांचा समावेश आहेत. पाकिस्तानात शीख धर्मियांशी जुळलेले १५३ पवित्र स्थळ आहेत. करतारपूर साहिब हे जगभरातील शिख भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. गुरु नानकजी देव यांचे १७ वर्ष या परिसरात वास्तव्य होते. याच ठिकाणी राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला. अंतिम समयी त्यांनी स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. खोलीचे दार कोणीही उघडू नये अशी सक्त ताकीद दिली. दोन दिवसांनंतर भाविकांनी दार उघडले असता तिथे केवळ एक चादर आणि फूलेच आढळली. त्याच ठिकाणी कालांतराने गुरुद्वाराची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या स्थानावर जगभरातील शिखांची प्रचंड आश्था असल्याची माहिती नाशिक येथील शिखधर्माचे अभ्यासक व पुण्यनगरीचे वाचक रघुनाथ चावला यांनी दिली. अमृतसर जवळील डेरा बाबा नानक गुरुद्वारापासून करतारपूर केवळ चार कि.मी. अंतरावर आहे. फाळणीच्या वेळेस भारतीय नेतृत्वाने मनावर घेतले असते तर हे ठिकाण आज भारतात असते. असेही मत त्यांनी व्यक्त केले.


   मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘करतारपुर कॉरिडोरच्या’ उद्घाटनप्रसंगी इम्रान खानचे भाषण चांगलेच गाजले होते. शिख आणि मुस्लिम एकतेची ही सुरुवात असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले होते. मात्र एका वर्षातच पाकिस्तान सरकारने आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे. करतारपुर साहिब या गुरुद्वाराचे प्रबंधन यापूर्वी ‘शिख समुदायाकडे’ होते. ते त्यांच्याकडून काढून आता ‘आयएसआय’ प्रणित ETPB या संघटनेकडे सोपविण्यात आले आहे.


      आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना असून तिचे कारणामे जगप्रसिद्ध आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये ही संघटना लिप्त असून आतंकवाद्यांना समर्थन करण्यात अग्रेसर आहे. अशा संस्थेकडे गुरुद्वाराचे नियंत्रण सोपवून पाकिस्तानने नव्या वादाला तोंड फोडले आहे.


   सोबतच पाकिस्तान सरकारने ‘प्रोजेक्ट बिजनेस’ नावाने एक उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत करतारपुर गुरुद्वारामधून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नावर आता पाकिस्तान सरकारचा ताबा असणार आहे. याचाच अर्थ पाकिस्तान ‘करतारपुर गुरुद्वाराकडे’ श्रद्धेचे केंद्र म्हणून न बघता एक सोने देणारी अंडी म्हणून बघत असल्याचे सिद्ध झाले आहे.
पाकिस्तानची ही कृती पंजाब प्रांतात विद्रोहाची भावना भडकविनारी असल्याचे सुरक्षाविषयक तज्ञांचे मत आहे. कारण सत्तेवर येताच काही दिवसातच इम्रान खानने करतारपुर कॉरिडोर भारतीयांसाठी खुले करीत असल्याची घोषणा केली होती. त्याच वेळेला भारतीय सुरक्षा विषयक तज्ञांनी इम्रानच्या घोषणेवर शंका व्यक्त केली होती. आता तर ही शंका प्रत्यक्षात उतरली आहे. या माध्यमातून पाकिस्तान खालिस्तानी कट्टरपंथीयांचा वापर पंजाबमधील शांतता व सुव्यवस्था बिघडविण्यासाठी करण्याची दाट शक्यता आहे.


   पाकिस्तानने हा निर्णय परत मागे घ्यावा अशी मागणी भारत सरकारच्यावतीने विदेश मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. मात्र हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे कारण पाकिस्तानने पुढे केले आहे. यापुढे भारतीय शिख श्रद्धाळू जे करतारपूर गुरुद्वाराला भेट देण्याकरिता जातील त्यांना २० डॉलर म्हणजे अंदाजे पंधराशे रुपये मोजावे लागणार आहे. भिकेला लागलेला पाकिस्तान कुठून-कुठून पैसा गोळा करेल हे आता सांगता येत नाही. ‘शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ता’ दलजित सिंह चिमानेही पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे.  ३० नोव्हेंबरला ‘गुरूनानक देवजी’ यांची ५५१ वी जयंती असून या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या या नापाक कृतीने जगभरातील शिख श्रद्धाळूंमधे संतापाची लाट निर्माण झाली आहे. पाकिस्तान आपल्या देशातील अल्पसंख्यांकाच्या हिताचे रक्षण कशाप्रकारे करते हे यावरुन स्पष्ट होते.


   करतारपुर साहिब परिसराच्या विकासाकरिता या गुरुद्वाराचे प्रबंधन ETPB कडे दिल्याचे या  सन्श्थेचे अध्यक्ष ‘अमार अहमद’ यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यामागे त्यांचा नापाक उद्देश जगापासून लपून राहिलेला नाही. भारताने आता करतारपूर यात्रा सुरू करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ही यात्रा बंद केली होती. गुरूनानक देवजी यांच्या ५५१ व्या जयंतीनिमित्त करतारपुर साहिब येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय शिख समुदायांनी सहभागी व्हावे, असे आमंत्रण पाकिस्तान कडून देण्यात आले आहे.


  धार्मिक मुद्द्याचा वापर राजकारणासाठी करण्याची पाकिस्तानची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे घडले आहे. मागच्याच वर्षी करतारपुर गुरुद्वाराच्या उद्घाटनाप्रसंगी गुरुद्वाराच्या दर्शनी भागात पाकिस्तानने ;बॉम्बचे प्रदर्शन’ भरवून नवीनच वादाला तोंड फोडले होते. १९७१ च्या ‘भारत-पाकिस्तान’ युद्धादरम्यान भारताकडून डागण्यात आलेल्या बॉम्बचे हे प्रदर्शन होते. हे बॉम्ब गुरुद्वारा आणि ज्या पवित्र विहिरीतून गुरूनानक देवजी आपल्या शेताला सिंचन करीत होते अशी मान्यता आहे ती विहीर उद्ध्वस्त करण्यासाठी भारताकडून टाकण्यात आले होते. मात्र वाहेगुरुच्या चमत्कारामुळे असे काही घडले नाही अशी बतावणी करत या बॉम्बच्या अवशेषांचे प्रदर्शन पाकिस्तानने गुरुद्वारा परिसरात केले होते. शिखांच्या भावना भडकविण्या करिताच पाकिस्तानने ही कृती केली होती. यावर भारताने प्रचंड आक्षेपही घेतला होता. यासोबतच गुरुद्वाराच्या उद्घाटनाप्रसंगी खलिस्तानी दहशतवादी भिंद्रानवाला व अन्य तीन दहशतवादी यावर आधारित एक चित्रफीतही प्रसारित केली होती. भारताला सदैव पाण्यात पाहणारा पाकिस्तान कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही.


    शिख धर्मियांच्या श्रद्धास्थानाच्या प्रबंधंनापासून शिखांनाच दूर ठेऊ पाहणार्‍या पाकिस्तान सरकारला ‘वाहेगुरू’ सदबुद्धी प्रदान करो, ही अपेक्षा...


- डॉ. संतोष संभाजी डाखरे

(लेखक हे गडचिरोली येथे प्राध्यापक आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा