Breaking

पेसा कायद्याअंतर्गत खाजगी जमिनीवरील हिरडयाच्या झाडांची सातबाऱ्याला नोंद करा - विश्वनाथ निगळे


जुन्नर : निसर्ग चक्रीवादळामूळे बाळहिरड्याचे झालेले नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे किसान सभेने केली आहे. पंचनामे होऊन सहा महिने झाले. पण नुकसान भरपाई मिळाली नसल्याने किसान सभेने विभागीय आयुक्त पुणे व आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांस स्मरणपत्र दिले असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी सांगितले.


राज्यात जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शेती पिकांचे , फळबागांचे तसेच घरे व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झालेले होते. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या तालुक्यातील शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला आहे. याबरोबरच या तालुक्यातील आदिवासी समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या हिरडा या वनउपज झाडाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. हिरडा या औषधी वनउपज फळाचा ऐन हंगाम असतानाच हे चक्रीवादळ झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच या भागात खाजगी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हिरडा झाडे आहे. हिरड्याच्या उत्पनातून वर्षभर स्थानिक आदिवासी आपल्या दैनंदिन गरजा पुर्ण करत असतात.हिरडा नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत व तालुका स्तरीय महसूल यंत्रणेने पंचनामे जिल्हास्तरीय यंत्रणेकडे सुपूर्त केलेले आहेत. परंतु अद्यापही या आदिवासी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. याबाबत शासनाने त्वरित दखल घेऊन या शेतकऱ्याना सहकार्य करावे अशी मागणी किसान सभेने केली आहे. 

तसेच महसूल विभाग व आदिवासी विकास विभाग यांनी संयुक्तिकपणे आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर जी हिरडा झाडे आहेत. त्यांची नोंद त्यांच्या सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी विशेष अभियान राबवावे. या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करणार असल्याचे लेखी निवेदन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अॅड. नाथा शिंगाडे, जिल्हा सणिव डॉ. अमोल वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ निगळे, डॉ. मंगेश मांडवे, लक्ष्मण जोशी, अमोद गरुड, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, राजू घोडे यांनी विभागीय आयुक्त पुणे व आयुक्त, आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा