Breaking

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवातपिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या लसीकरणाला आज (दि.१६) सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आज लसीकरण झाले. आठ केंद्रावर वैद्यकीय क्षेत्रातील ८०० जणांना लस दिली गेली. पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना सर्वप्रथम लस देवून लसीकरणाची सुरुवात झाली आहे.


पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात सुरू झालेल्या या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेविका सविता खुळे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसेवक संदीप वाघेरे, शैलेश मोरे, नगरसेविका उषा वाघेरे, निर्मला कुटे, निकिता कदम, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीत तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर उपस्थित होते.


लस घेण्यापूर्वी लस टोचक अधिकारी माहिती देतात. लस टोचल्यानंतर त्यांना अर्धा तासासाठी निरीक्षक कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येते. कोणताही त्रास होत नसल्यास घरी सोडले जाते. तसेच दुस-या डोसबाबत माहिती दिली जाते. एक महिन्याने तो डोस दिला जातो.


आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडून कोविड - १९ लसीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला १५ हजार डोस प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस टोचण्यात येणार आहे.  महापालिका, खासगी रुग्णालयातील अशा १७ हजार ७९२ आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची महापालिकेकडे नोंदणी झालेली आहे.महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दिवसभरात एका केंद्रावर १०० जणांना लस टोचण्यात आली. अशा ८ केंद्रावर एकूण ८०० जणांना दिवसभरात लस देण्यात आली. तर, एक महिन्याने दुसरा डोस दिला जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. 


‘या’ ८ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात..!


लसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळेनिलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय या ८ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा