Breaking

शेतकरी आंदोलन : कामगार सायकल रॅलीला पिंपरी चिंचवड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसादपुणे : येथे २५ जानेवारीला राजभवनावर जाणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी यवत येथून २० जानेवारीला निघालेली कामगार सायकल रॅली २२ रोजी आकुर्डी येथे संध्याकाळी पोचली. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी सुमारे ५० सायकल स्वार, कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर आणि डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला निघाले आहेत.


यवत ते मुंबई या प्रवासात २३ जाने. रोजी या रॅलीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये, पिंपरी चौक, आकुर्डी आणि निगडी येथे स्वागत सभांचे आयोजन करण्यात आले होते. कामगार संघटना संयुक्त कृती समिती, पुणे जिल्हा आणि जन आंदोलनाची संघर्ष समिती, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांना स्थानिक कामगार वर्ग आणि घरकामगार महिलांची चांगली उपस्थिती होती. आकुर्डी येथील सभेत शिवसेनेच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. गजानन चिंचवडे, योगेश बाबर, उर्मिला काळभोर यांनी भाषणे करून कामगार रॅलीला शुभेच्छा आणि पाठिंबा दिला.


निगडी येथील सभेत ज्येष्ठ नागरिक संघाने सर्व सायकल स्वराना गुलाबाची फुले देऊन शुभेच्छा दिल्या. पिंपरी येथील सभेत तळेगाव येथील जनरल मोटर्स या कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने हजर होते. ही कंपनी सध्या बंद असून कामगारांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न तेथे निर्माण झाला आहे.


रॅलिमध्ये इंटक, Aituc, सीटू, श्रमिक एकता महासंघ, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, अनिस, लोकजागर ग्रुप या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या सभांमध्ये डॉ. कैलास कदम, कॉ. अजित अभ्यंकर, डॉ. सुरेश बेरी, कॉ. वसंत पवार यांनी भाषणे करून मोदी सरकारच्या कामगार आणि शेतकरी धोरणांविरुद्ध कडाडून हल्ला चढविला. त्यावेळी कामगारांनी सरकारविरुद्ध घोषणा देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


रॅली आणि कोपरा सभा यशस्वी करण्यासाठी  कॉ. गणेश दराडे , कॉ. अपर्णा दराडे, मनोज पाटील, कॉ. अनील रोहम, सचिन देसाई, राम नलावडे, सुधीर मुरुडकर, एकनाथ पाठक, मनोहर पद्मन, विकास सूर्यवंशी, गोकुळ बंगाल इ. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा