Breaking
सोलापूर : सायली गुर्रम यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मुस्लिम समाजातर्फे आर्थिक मदत


सोलापूर : पद्मसाली समाजातील विडी कामगारांची मुलगी सायली गुर्रम हिने कुठलाही क्लास न लावता मेरिटमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. सायलीला वडील नाहीत. आई विडी कामगार असून मोठ्या परिश्रमातून उदर निर्वाह करते. अशा परिस्थितीत मेडिकल शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याची बातमी एका वृत्तपत्रातून आली होती, ती वाचून परिवर्तन अॅकॅडमीचे कॉम्रेड रवींद्र मोकाशी यांनी सामाजिक सलोखा वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने मुस्लिम समाजाने सदर मुलीस आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा हसीब नदाफ यांच्याकडे व्यक्त केली. 


सदर प्रस्ताव जमियत उलमा ए हिंदचे मौलाना  ईब्राहिम कासमी यांनी मान्य करून दोन दिवसात रुपये 55000 जमा केले व ती रक्कम सायली गुर्रम  यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. 

यावेळी मौलाना ईब्राहीम कासमी म्हणाले, ईस्लाम मध्ये मानवतेला खूप महत्त्व आहे. अडचणीत असलेल्या कुठल्याही व्यक्तीस जात, धर्म, पंथ असा कुठलाही भेद न करता मदत करावी असा संदेश ईस्लामने दिलेला आहे. त्यासाठी जमियात उलमा-ए-हिंद ने पुढाकार घेऊन मुस्लिम समाजातर्फे सदर  मदत केली असल्याचे सांगितले.

या मानवतावादी कार्याबद्दल कॉ.आडम मास्तर यांनी विडी कामगारांच्या वतीने मुस्लिम समाजाचे आभार मानले. माजी महापौर जनार्दन कारमपूरी यांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने यावेळी मुस्लिम समाजाचे आभार व्यक्त केले. या घटनेने महाराष्ट्रात सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. भविष्यात गरज पडल्यास सायली गुर्रमला सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा मनोदय यावेळी हसीब नदाफ यांनी जमियत उलमा-ए- हिंदच्या वतीने व्यक्त केला.
 
हाजी नसिरअहमद खलीफा, शफीभाई ईनामदार, शौकत पठान, हाजी मतीन बागवान, हाजी मैनोद्दीन शेख, हाजी अ.सत्तार दर्जी, अ.रशिद आळंदकर , मैनोद्दीन नदाफ, हाजी मुश्ताक चडचणकर, तौहीद ज्वेलर्सचे अकील शेख, अ.मजिद गदवाल, हाजी मुश्ताक ईनामदार आदींनी ही मदत केली.
          
यावेळी कॉम्रेड रवींद्र मोकाशी, हसीब नदाफ, अशोक इंदापुरे, शौकत पठाण, मीरा कांबळे, हाजी अ. सत्तार दर्जी, हाजी मुश्ताक ईनामदार, अ. शकूर खलीफा यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा