Breaking
‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवारप्रबोधन शताब्दी सोहळ्याचा समारोप


पुणे : ‘प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केले असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.


बालगंधर्व रंगमंदीर येथे प्रबोधन शताब्दी सोहळ्याचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, खा. गिरीष बापट, आ. संजय शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संवाद संस्थेचे सुनील महाजन, हरिष केंची, किरण साळी, सचिन विटकर उपस्थित होते.


‘संवाद-पुणे’ संस्थेने आयोजित केलेल्या, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या संपादकात्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाचा शतकोत्सव सोहळयासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने ‘प्रबोधन’ च्या शतकमहोत्सवी वाटचाल, त्यांची पत्रकारिता अभिनंदनीय आहे. प्रबोधनकार प्रभावी वक्ते, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार, साहित्यिक, तैलचित्रकार बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी ‘प्रबोधन’ पाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. ‘प्रबोधन’ पाक्षिकाने महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली, नव्या विचाराची पिढी घडविण्यात सिंहाचा वाटा उचलला. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.


विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहरात प्रबोधनाचा विचार मांडण्याचे कार्य प्रबोधनकार ठाकरे यांनी केले आहे. प्रबोधनच्या शतकोत्सव कार्यक्रमामध्ये सर्वच विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संवादच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


खा. गिरीष बापट म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजामध्ये बदल करण्यासाठी अनेक उपक्रमात सहभाग घेतला असून समाजामध्ये विचारांची क्रांती केल्याचे सांगितले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘प्रबोधन’ पाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. प्रबोधनकरांचे विचार पुरोगामी होते, प्रबोधनकारांच्या विचारांची आजही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.


कविसंमेलनाचा उस्फूर्त प्रतिसाद


संवाद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक, प्रबोधनपर तसेच विविध विषयावरील कवितांना रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, डॉ. दिलीप पांढरपट्टे, भरत दौंडकर, अरूण पवार, तुकाराम धांडे, बंडा जोशी यांनी संमेलनात सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा