Breaking

आंबेगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णांचा होतेय मृत्यू; किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु


किसान सभेचा आरोप : तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू


आंबेगाव (पुणे) : तळेघर ता. आंबेगाव येथील आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही व तालुक्याच्या ठिकाणी पाठवताना वाटेतच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्राची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा खोऱ्यांचा प्रदेश आहे. भिमाशंकर, पाटण व आहुपे, आसाणे ही गावे अत्यंत डोंगर दऱ्यांत वसलेली आहेत. या भागातील रोजगाराच्या पश्नाबरोबरच आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. आरोग्याचा प्रश्न मिटावा म्हणून तळेघर, तिरपाड, अडिवरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु आरोग्य केंद्राच्या आरोग्य केंद्राच्या गचाळ कारभारामुळे स्थानिक कष्टकरी, आदिवासी बांधवांचे प्राण गेलेले आहेत व पुढे ही जात राहतील, रुग्णांवर नीट उपचार न झाल्याने त्यांना अनेक वेळा खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात. दवाखान्यात डॉक्टर असूनही नसल्यासारखे चित्र आहे, असा आरोप किसान सभेचे सचिव अशोक पेकारी यांनी केला आहे.

तर आम्ही प्रतिबंधक उपचार रुग्णांना देतो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी डॉक्टरांना निवासस्थाने नाहीत. पदे रिक्त आहेत. तसेच रुग्णांना प्रतिबंधक उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात दिले जातात. परंतु अतिदक्षता गरज असल्याने रुग्णांना रेफर केले जात असल्याचे डॉ. बिरारी म्हणाले.

तर किसान सभेच्या शिष्टमंडळाला तालुका अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी दि. ३१ डिसेंबर २०२० लेखी देऊनही डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे किसान सभेने म्हटले आहे. 

किसान सभेने केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :

◆ तळेघर येथे निवासी डॉक्टर असावेत.

◆ तळेघर येथे मूळ नियुक्तीस असलेले डॉ. उभे यांना त्यांच्या मूळ जागी आणावे. तसेच तळेघर येथे दोन डॉक्टर असावेत, त्यातील किमान एक डॉक्टर निवासी असावे.

◆ डॉ. बिरारी हे दोन मृत्यूस जबाबदार आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व तोपर्यंत त्यांना निलंबित करावे.

◆ डॉ. बिरारी यांच्या विविध तक्रारी मांडून ही त्यांची दखल न घेणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी.

धरणे आंदोलनाच्या वेळी अशोक पेकारी, राजू घोडे, कृष्णा वडेकर, सुभाष भोकटे, देविका भोकटे, रामदास लोहकरे, अशोक जोशी, दत्ता गिरंगे, नंदा मोरमारे, मच्छिंद्र वाघमारे, राजू ईष्टे, ज्ञानेश्वर मेमाणे, सुनील पेकारी, कुंडलिक केंगले, अशोक पारधी, महेश गाडेकर हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा