Breaking
मोठी बातमी : कवी यशवंत मनोहर यांनी 'जीवनव्रती पुरस्कार' नाकारला, सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यास विरोध

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'जीवनव्रती पुरस्कार' प्रसिद्ध कवी व विचारवंत यशवंत मनोहर यांनी नाकारला. पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये. त्याऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, किंवा ताराबाई शिंदे यांची प्रतिमा ठेवावी, अशी विनंती त्यांनी विदर्भ साहित्य संघाला केली होती; परंतु विदर्भ साहित्य संघाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला.


विदर्भ साहित्य संघातर्फे मराठी साहित्यविश्वात आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या विदर्भातील साहित्यिकाला दरवर्षी कै.ग. त्र्यं . माडखोलकर यांच्या नावाने 'जीवनव्रती' हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध विचारवंत व आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर यांना याआधीच जाहीर झाला होता. आज १४ जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात येणार होता; परंतु या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणार असल्याचे कळल्यावर त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्याला संदेश पाठवून सरस्वतीची प्रतिमा न ठेवण्याची विनंती केली. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकाची प्रतीके मी आयुष्यभर नाकारली आहेत. मग, आता या प्रतीकांची प्रतिष्ठा मी का वाढवू, असा सवालही त्यांनी या संदेशात उपस्थित केला; परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ होत आली तरी विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ साहित्य संघाला कळवला. 

त्यांच्या या निर्णयाने साहित्यविश्वात मोठी खळबळ उडाली. इतर सत्कारमूर्तीबरोबर मंचावर यशवंत मनोहर न दिसल्याने त्यांच्याबाबत विचारणा सुरू झाली. खरे कारण कळल्यावर कार्यक्रमस्थळाचा नूरच बदलला. यशवंत मनोहरांच्या नकाराची छाया कार्यक्रमस्थळी स्पष्ट जाणवायला लागली. विदर्भ साहित्य संघाने मात्र अद्याप याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'माझा सरस्वतीशी काय संबंध? - यशवंत मनोहर

मी धर्म मानत नाही, म्हणूनच लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझा रागही करतात; पण म्हणून मी कधीही माझी भूमिका बदलली नाही. भारतात इंग्रज येईपर्यंत सरस्वती पूजलीच जात होती. मग, या देशातील शूद्रातिशूद्र, स्त्रिया का अज्ञानी राहिल्या? माझा सरस्वतीशी काय संबंध? अशा प्रतिमा या शोषणसत्ताकाची प्रतीके आहेत. कार्यक्रम जर साहित्यविषयक असेल तर त्यात कुसुमाग्रज , मुक्तिबोध, इंदिरा संतांची प्रतिमा ठेवायला हवी. माझी हीच भूमिका मी चार दिवसांआधी विदर्भ साहित्य संघाला कळवली होती; परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी हा पुरस्कार नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतला. बाकी या पुरस्काराविषयी माझ्या मनात आदरच आहे. पुरस्काराला विरोध असण्याचे काहीच कारण नाही.
 
सरस्वती आमच्या श्रद्धेचे प्रतीक - मनोहर म्हैसाळकर (अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ)

ज्या सभागृहात कार्यक्रम झाला त्या सभागृहाचे नावच रंगशारदा आहे. हे शारदेचे मंदिर आहे आणि सरस्वती आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे सरस्वतीची प्रतिमा हटविण्याचा प्रश्नच नाही. यशवंत मनोहर यांना ते पटत नसेल तर त्यांचा मताचा मी आदर करतो. दरवर्षी आम्ही ज्या पद्धतीने कार्यक्रम करतो त्याच पद्धतीने तो यंदाही झाला. हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार स्वीकारण्याचे मान्य केले होते. आता मात्र वैयक्तिक कारणामुळे येऊ शकत नाही, असा त्यांचा निरोप आला.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा