Breaking

विशेष लेख : विषारी राजकारण आणि लोकशाहीचे सरंक्षण - प्रसाद कुलकर्णीपराभूत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या 'कॅपीटॉल' वर केलेला हल्ला हा लोकशाही व्यवस्थेवरचा हल्ला आहे. जगाला लोकशाही शिकवणाऱ्या अमेरिकेत तो झाला.पण तो का व कशामुळे झाला हे लक्षात घेतले पाहिजे. कारण ही राजकीय विकृती सर्व जगभर फोफावते आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी म्हटल्याप्रमाणे हा विषारी राजकारणाचा परिणाम आहे. ते अगदी खरे आहे. गेल्या दशकभरात जगभरच ट्रम्प यांच्यासारखे असे विषारी राजकारण करत बहुसंख्यांकवादाचा व संकुचित सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अनुनय करणारे अविवेकी व धादांत खोटे बोलणारे नेते  सत्तेवर आले आहेत. हे नेते  कमालीचे व्यक्तिवादी  असतात.त्यांची सत्ता देशाच्या वा सत्ताधारी पक्षाच्या ऐवजी त्यांच्या व्यक्तिगत नावाने ओळखले जाते. हे नेते व त्यांचे एक- दोन अपवादात्मक सहकारी सोडले तर  सत्तेतील  इतर सहकारी जनतेला माहीत नसतात. कारण फारसा स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य नसते. अशा नेत्यांच्या काळात अल्पसंख्यांकांच्या वर अत्याचार, मॉब लिंचींग सारखे प्रकार, धर्मवादी व जातीयवादी विषारी व खोटा प्रचार हे प्रकार वाढत असतात. हे नेते आपल्या कार्यकर्तृत्वावर बोलण्याऐवजी विरोधकाना हिणवण्यात, माध्यमांसह सर्व स्वायत्त संस्था सर्व प्रकारची सत्ताशक्ती वापरून आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करतात. विरोधकांना भीती दाखवण्यात, सोशल मीडियावर पेड कार्यकर्ते नेमून खोट्या बातम्या पेरण्यात, फेक खाती उघडून समाजस्वास्थ्य बिघडवण्यात आघाडीवर असतात. ही नेते मंडळी पत्रकार परिषदांना सामोरे जात नाहीत पण कायम प्रसिद्धीचा झोत सतत आपल्यावर येईल याची व्यवस्था करतात.


निवडणुकीतील पराभव ज्यांना संयमाने घेता येत नाही ते हुकूमशाही विकृतीने ग्रस्त असतात.लोकशाही व्यवस्थेत कार्यकर्ते असतात तर हुकूमशाही विकृतीत अंधभक्त असतात. अमेरिकेतील ट्रम्प यांच्या अंधभक्तांनी हा निर्लज्ज प्रकार केला आहे. जो त्यांच्या पक्षातील लोकांनाही निषेधार्ह वाटला. यावरून लोकशाहीचे माध्यम वापरून निवडून आल्यावर जे हुकूमशाही करतात आणि आपल्या पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजू लागतात त्यांनी बोध घेण्याची गरज आहे. कारण कोणतेही विषारी राजकारण फार काळ टिकत नसते. भरल्या पोटी ढोंगाचे समर्थन करणारे अंधभक्त कदाचित सदैव निर्बुद्ध राहू शकतील. पण सर्वसामान्य जनता आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्वकाळ निर्बुद्ध राहू शकत नाहीत. कोणत्याही सत्ताधीशाचा अहंकारी हेकटपणा आणि त्यांच्या समर्थकांचा उद्दामपणा फार काळ टिकू शकत नाही हे वास्तव आहे.


काही महिन्यांपूर्वी येल विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक टीमथी स्नायडर यांनी 'लोकशाहीच्या संरक्षणासाठी' काय केले पाहिजे याचे वीस मुद्दे दिले होते. त्याचा मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांच्या वॉल पासून अनेक ठिकाणी प्रसारित झाला आहे. जिज्ञासू वाचकांनी ते मुळातून वाचण्यासारखे आहे. कारण ट्रम्प सारख्या विकृत सत्ताधार्‍यांच्या विरोधात लढायचे असेल तर तर लोकशाहीच्या संरक्षणासाठी सर्व ती उपाययोजना करावी लागेल. त्यांच्या मते, बऱ्याचशा अधिकार शहांना जी सत्ता मिळते ती लोक स्वतःहून देत असतात. त्यांना अपेक्षित असलेला आज्ञाधारकपणाआधीच देऊ केला तर त्यांची आपल्या स्वातंत्र्यावरील जुलमी पकड अधिक गडद होत असते. तसेच लोकशाही वाचवायची असेल तर संस्थांचे संरक्षण करा. न्यायालये, माध्यमे किंवा वृत्तपत्रे यांचा मागोवा घेत राहा. संस्था कधीच स्वतःला संरक्षित करू शकत नसतात. त्यांना सुरुवातीपासून विचारसामर्थ्याचे पाठबळ नसेल तर त्या गडगडत जातात. कायद्याचे राज्य मोडीत काढणे वकीलांशिवाय शक्य होत नाही आणि दिखाऊ खटले चालवणे न्यायाधीशांशिवाय शक्य होत नाही. देशभक्तीच्या फसव्या शब्द योजनांबद्दल मनात शब्दात असायला हवा.


सत्यावर विश्वास ठेवा. वास्तव नाकारणे म्हणजेच स्वातंत्र्य नाकारणे. काहीच सत्य नसेल तर मग सगळाच देखावा. आंधळे करून सोडणार्‍या झगमगाटावर कुणीतरी भरपूर पैसा खर्च करत असतो हे कधीही विसरायचं नाही. एकपक्षीय राष्ट्राच्या कल्पनेला विरोध करा. ज्या पक्षाने आजवर एकछत्री सत्ता काबीज केली ते कधीतरी काही काळापूर्वी वेगळे होते. आपल्या विरोधकांना मोडून काढण्यासाठी त्यांनी एखादा ऐतिहासिक क्षण वापरून घेतला. असे होऊ नये म्हणून सर्व निवडणुकीत सहभागी होऊन मताचा अधिकार बजावा. धैर्यवान राहण्याचा प्रयत्न करा. आपल्यापैकी कुणीच स्वातंत्र्यासाठी मरायला तयार नसेल तर आपण सारेच स्वातंत्र्याविना मरून जाऊ. स्नायडर यांच्या लेखातील हे काही मुद्दे ध्यानात घेतले पाहिजे.


डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या बगलबच्या समर्थकांना लोकशाही मूल्याचा विसर पडला आहे.किंबहुना त्यांनी त्याला पद्धतशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता जनतेची म्हणजे लोकांची असते. राजाची सत्ता असणारी राजेशाही असते तसेच लोकांची लोकांची सत्ता असणारी लोकशाही अभिप्रेत असते. देशाचा प्रत्येक नागरिक हा सत्तेचा चालक- मालक बनू शकतो. लोकांच्या सार्वभौम सत्तेचे व लोकशाहीचे भले होणार असेल तर ते लोकच करणार. आणि वाटोळे करून ठोकशाहीची राजवट आणायची असेल तर तीही लोकच आणणार.


लोकशाहीत सर्वांना समान संधीचे आश्वासन असते.जनतेच्या संमत्तीवर आधारित आणि विचार, उच्चार, आचार, संघटन आदींचे स्वातंत्र्य ही तिची वैशिष्ट्ये असतात. लोकशाही व्यवस्थेवर अनेकजण टीका करतात. अर्थात अशा टीका पूर्वीपासून होत आल्या आहेत. हुकुमशाहीत  दमनाचा धोका तर लोकशाहीत प्रलोभनाचा धोका असतो असे गांधीजी म्हणाले होते. तसेच ते "धोक्यापासून अलिप्त अशी कोणतीच मानवी संस्था नाही. जितकी संस्था मोठी तितका दुरुपयोग होण्याचा संभव असतो. पण म्हणून लोकशाही टाळणे हा त्यावरचा उपाय नसून तिचा दुरुपयोग होण्याची संभाव्यता कमी करणे आहे हा आहे", असेही म्हणाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय निर्लज्ज कृती केली आहे. याचे कारण त्यांच्या निर्लज्ज विचारधारेत आहे. 


गेल्या दशकभरामध्ये जगातील अनेक देशांमध्ये  समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत, आपण मसीहा असल्याचे दाखवत, जमिनी वास्तवाचे प्रश्न सोडून भावनिक प्रश्न निर्माण करत काही नेते  प्रस्थापित झालेले आहेत. ते लोकशाहीच्या सर्व आयुधांचा वापर करत त्या आधारे हुकूमशाही प्रस्थापित करत आहेत. हे तथाकथित स्वप्रतिमी मग्न नेते बहुसंख्याकवाद व संकुचित सांस्कृतिक राष्ट्रवाद यांची जोपासना करत आहेत. अशा मनमानी नेतृत्वामुळे त्या त्या देशाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात मोठी पीछेहाट झाली आहे. आपला हाच पराभव लपवण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांच्याद्वारे लोकशाहीवर हल्ला करण्याचा बालिश प्रयत्न केला. मात्र  जगभरच्या  लोकशाहीवादी नागरिकांनी या घटनेपासून बोध घेतला पाहिजे. आणि आपण कोणाची तळी उचलत आहोत याचा विचार केला पाहिजे. तसेच असे विकृत सत्ताधीश निरनिराळ्या देशात प्रस्थापित होणे का जागतिक भांडवली षडयंत्राचा भाग असू शकतो. कारण असे सत्ताधीश निवडून येणे हा प्रकारही संशयास्पदरित्या जगभर वाढत आहे. ट्रम्प यांच्या चार वर्षांपूर्वीच्या विजयात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना असलेला रस आणि त्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत केलेला सर्वांगीण हस्तक्षेप या गोष्टी लपून राहिलेल्या नाहीत. निवडणूक यंत्रणा ते मत मोजणी या साऱ्याबाबत संशयी वातावरण जगभर का निर्माण होत आहे ? हा प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही.म्हणूनच ट्रम्प यांच्या विकृत विषारी राजकारणापासून जगभरच्या लोकशाही मानणाऱ्यानी बोध घेतला पाहिजे. ट्रम्प यांच्यावर ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युब यांनीही कारवाई केली आहे. सदासर्वकाळ खोटेपणा माध्यमेही खपवून घेत नाहीत. खरतर याच माध्यमांनी ट्रम्प आणि त्यांच्या चिथावणी खोरांना मोठे केले होते. प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट केली होती. माध्यमे लाटेवर स्वार करू शकतात तशीच क्षणात ताळ्यावरही आणू शकतात. लोकशाहीत तर लोकशक्ती सर्वश्रेष्ठ असते.- प्रसा माधव कुलकर्णी

- इंचलकरंजी (कोल्हापूर)


(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी च्या वतीने गेली एकतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या "प्रबोधन प्रकाशन प्रकाशन ज्योती" मासिकाचे ‘संपादक’ आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा