Breaking

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चामध्ये सिटूचे दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार - डॉ. डी. एल. कराड


नाशिक : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व तीन कृषी बिले व कामगार विरोधी चार श्रमसहिंता रद्द कराव्यात या मागणीसाठी मुंबई येथे होणाऱ्या 24, 25 जानेवारी रोजी महापडाव आंदोलनात दहा हजार कार्यकर्ते सहभागी करण्याचा निर्णय सीटूच्या पदाधिकारी बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले.


या आंदोलनांतर्गत 23 जानेवारी रोजी राज्यभरातून वाहन मोर्चे मुंबईकडे येणार आहे. तसेच २४, २५ जानेवारीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर महापडाव आंदोलन होईल. 25 जानेवारी रोजी राजभवनावर मोर्चा काढून राज्यपालांना निवेदन देण्यात येईल. 26 जानेवारी रोजी सकाळी आजाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वज वंदन होऊन आंदोलनाचा समारोप होणार आहे.

हे आंदोलन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जनआंदोलन संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. या आंदोलनास बिगर भाजप  सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. विद्यार्थी, युवक व महिला यांच्या संघटनाही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कामगार, शेतकरी व जनता विरोधी व देश विघातक धोरणे राबवित आहे. कामगारांचे २९ केंद्रीय कायदे रद्द करून कामगार विरोधी ४ कायदे मंजूर करण्यात आले आहेत व त्याद्वारे कामगारांवर गुलामगिरीला देण्यात येत आहे. त्याच वेळेला शेतकऱ्यांची मागणी नसताना शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे मंजूर करण्यात आले आहेत व वीज बिल 2020 प्रस्तावित आहे, असे ही सिटूने म्हटले आहे.

कोरोना काळांमध्ये शेतकरी व कामगार विरोधी कायदे मंजूर करून सरकार थांबले नाही तर सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारे नवे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. सार्वजनिक उद्योग व सेवा यांचे खाजगीकरण आणि विक्री करण्याचे निर्णय मोदी सरकार झपाट्याने घेत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था व आर्थिक स्वावलंबन धोक्यात आले असून बड्या कंपन्यांचे हित साधण्यासाठी विशेषतः अदानी अंबानी यांना फायदा व्हावा यासाठी आर्थिक धोरण व कायदे करण्यात आल्याचा आरोप सिटूने केला आहे. यामुळे शेतकरी, कामगार व जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून या आंदोलनाच्या माध्यमातून तो व्यक्त होणार आहे. जनतेने शेतकरी कामगार यांच्या आंदोलनास सक्रिय पाठिंबा द्यावा असे आवाहन सिटू राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी केले आहे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा