Breaking

आळंदी पंढरीचे वारकरी सय्यद बासुभाई यांचे निधन

काकडा भजनातुन करायचे जनजागृती, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी भरीव कामगिरी


वडवणी : वारकरी संप्रदाय हा जाती पाती मानत नाही. तो धर्माच्या पलीकडे जाऊन फक्त  मानवता हाच धर्म शिकवतो. हे आपल्या वागणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, मोरवड येथील सय्यद बासुभाई यांनी. काकडा भजन, भैरवी, हरी जागरातुन समाज जागृती करून हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे काम करणारे सय्यद बासुभाई यांचे  शनिवारी रात्री निधन झाले.


वडवणी तालुक्यातील मोरवड येथील बासुभाई यांचे नाव आज संपूर्ण परिसरात चर्चिले जात आहे.  मुस्लिम परिवारातील बासूबाई यांचे वडील सय्यद दगडूभाई हे गावातीलच ह.भ.प. अश्रुबा पाटील शेळके यांच्याकडे काम करीत असत. आश्रुबा पाटील शेळके वारकरी संप्रदायातील खूप मोठं नाव होतं. संत भगवान बाबा हे आश्रुबा पाटील शेळके यांच्या घरी नेहमी येत असत. वडिलांसोबत बासुभाई हे शेळके यांच्या घरी नेहमी जात असत. ते संत भगवान बाबा यांच्या सानिध्यात आले. संताचे चरणस्पर्श त्यांना शेळके यांच्या घरी लाभले. संत भगवान बाबा यांनी आशीर्वाद दिल्यामुळे तेव्हापासूनच ते वारकरी संप्रदायाला मानू लागले. या जगामध्ये सर्वात पवित्र आणि मानवाचे कल्याण करणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय असल्याची त्यांची भावना होती. पहाटे काकडा भजन, गोड आवाजातले भजन, कीर्तनामध्ये वीणा गळ्यात घेऊन बासुभाई भगवंताच्या नामस्मरणात एवढे तल्लीन व्हायचे की दोन-दोन तीन-तीन तास गायन केल्यानंतरही त्यांना कंटाळा वाटत नसे. 

 

हिंदू मुस्लिम ऐक्य स्थापन करण्यासाठी बासुभाई यांनी भजन आणि किर्तनाच्या माध्यमातून जागृती केली. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर,  किंवा संत तुकाराम महाराजांच्या वाणीत बोलायचे  झाल्यास विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म्, भेदाभेद भ्रम  अमंगऴ या संप्रदायाने जातीय प्रथेला कडाडुन  विरोध केला म्हणुन तर आपल्याला वेगवेगऴया  जाती धर्मातले लोक या वारकरी संप्रदायामध्ये दिसुन  येतात. त्यात माउली महाराज (ब्राम्हन) तुकाराम  महाराज (मराठा), संत सावता माऴी, चोखा मेऴा (महार), नामदेव महाराज (शिंपी) कबीर, लतीफ  (मुस्लीम) आदी. याच पंरपरेला अनुसरुन मौजे   मोरवड येथील बासुभाई होते. धर्मान मुस्लीम  असुनही पुर्ण जीवनभर वारकरी जीवन ते जगले. वारकरी जीवन जगत असताना वारकरी संहीतेच पालन करुन वारकऱ्यांचे दैवत पांडुरंगाची जन्मभर  सेवा केली. अल्ला आणि विठ्ठल हे एकच आहेत. ते  दिसायला दोन दिसतात पण अंतकरणातुन  पाहील्यास ते एकच आहेत हा जणू मंञच त्यांनी स्वत:च्या  जीवनात अंगीकारला होता. विठ्ठल विठ्ठल  म्हणतच त्यांनी या जगाचा निरोप  घेतला. काल  त्यांची प्राणज्योत मालवली ते आता वैकुंठात गेले  आणि विठ्ठलासी एकरुप झाले. म्हणुनच म्हनाव  वाटत की, धन्य आजि दिन संत दर्शनाचा अनंत  जन्मीचा शीऩ गेला. अशा संताची मला संगत  घडली. हे माझ्या सारख्या पामराच भाग्य आहे.

- ह.भ,प. डॉ. गोविंद मस्के, वडवणी


आळंदी पंढरपूरची वारी त्यांनी अविरत केली. पंढरीच्या पांडुरंगामध्येच मला अल्लाह दिसतो अशी त्यांची भावना होती. घरची परिस्थिती हालाखीची असली तरी लाकूड व्यवसाय करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मागील एक वर्षभरापासून ते आजारी होते. शनिवारी रात्री आठ वाजता त्यांचे निधन झाले. मोरवड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आश्रुबा पाटील शेळके यांचे नातू नारायणराव शेळके यांच्यासह गावातील सर्व भजनी मंडळी उपस्थित होते. वडवणी परिसरात त्यांना सर्व वारकरी परिवारातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा