Breaking

पिंपरी चिंचवड : लसीकरण करताना हायरिस्कमध्ये काम केलेल्या आरोग्य कर्मचारी आणि निवासी डॉक्टर यांंना प्रथम प्राधान्य का नाही, माकपचा सवाल


पिंपरी चिंचवड : लसीकरण करताना हायरिस्कमध्ये काम केलेल्या आरोग्य सेविका, वार्ड बॉय, परिचारिका आणि निवासी डॉक्टर यांंना प्रथम प्राधान्य का नाही, असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केला आहे. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री अजित पवार यांना सुध्दा निवेदन पाठवले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, वाय.सी.एम ने बनवलेल्या यादीत निवृत्त कर्मचारी आणि नॉन कोव्हीड प्रशासकीय लाभार्थी यांची नावे  टाकण्यात आलेली आहेत. मनपाच्या आरोग्य विभागातील शेकडो कर्मचारी विशेषतः परिचारिका, आया, वार्ड बॉय, निवासी डॉक्टर हे कोरोना काळात रुग्णांवर उपचार करत होते. लसीकरण करताना रुग्णसेवेत असलेल्या मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलेले नाही. वायसीएम ने बनवलेल्या यादीतील तीन डॉक्टर तीन महिन्या पूर्वी वायसीएम ची नोकरी सोडून गेले आहेत तसेच ज्यांचा काही कोव्हीड रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क आणि संबंध नव्हता, अशा प्रशासकीय दोन कर्मचाऱ्यांची लसीकरण यादीत नावे कोणी समाविष्ट केली.

वायसीएम हॉस्पिटल कोव्हीड समर्पित होते. त्या ठिकाणी काम केलेल्या आरोग्य कर्मचारी, नर्सेस, वार्ड बॉय, निवासी डॉक्टर्स यांची नावे प्रधान्याने लसीकरणासाठी का समाविस्ष्ट करण्यात आली नाहीत. केंद्र सरकारने अशा कोव्हीड योध्या कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे असे आदेश दिले आहेत, त्याला प्रशासनाने केचराची टोपली दाखवली आहे.
 
मनपाच्या कोव्हीड समर्पित दवाखान्यामध्ये तसेच कोव्हीड केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांची दखल न घेता संबंधित लसीकरण विभाग प्रमुखांनी निवृत्त कर्मचारी, हाय रिस्कमध्ये काम न केलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची लसीकरण प्राधान्य यादी मध्ये नावे नोंद केली आहेत. रुग्णांच्या थेट संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्यांना या यादीत प्राधान्य का देण्यात आले नाही? ज्यांनी कोरोना रुग्णांवर उपचार केलेले नाहीत, तसेच जे निवृत्त कर्मचारी आहेत, त्यांना लसीकरांसाठी प्राधान्य का देण्यात आले? असा सवाल माकपने केला आहे.
 
त्यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न करता वशिलेबाजी करून लसीकरणाची केलेली यादी शेकडो हायरिस्कमध्ये काम केलेल्या कोव्हीड योध्या कर्मचाऱ्यांंवर अन्याय करणारी आहे. सदरच्या यादीमध्ये वशिलेबाजीने नाव नोंद झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नावे वगळावीत, आणि नवीन यादी तयार करून कोव्हीड काळात काम केलेल्या आरोग्य सेविका, परिचारिका, निवासी डॉक्टर, वार्डबॉय यांचे लसीकरण आधी करावे, अशी मागणी माकपचे गणेश दराडे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा