Breaking


अहमदनगर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अकोलेत करणार ग्रामविकासाच्या 'आंबेगाव पॅटर्न'ची अंमलबजावणी


अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील ग्रामविकासाला नवे वळण देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नव्याने पुढाकार घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील फलोदे भागात किसान सभेच्या पुढाकाराने सुरू असलेल्या ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक अनुकरण करण्यासाठी माकपच्या पुढाकाराने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. 


तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माकपला चार ग्रामपंचायतींमध्ये चांगले यश मिळाले. मित्र पक्षांच्या मदतीने दोन ग्रामपंचायतींमध्ये माकपचे सरपंच निवडले गेले. शिवाय बोरी ग्रामपंचायतीमध्ये पुढील टप्प्यात अडीच वर्षासाठी जनवादी महिला संघटनेच्या अनिता साबळे यांना सरपंच बनविण्याबाबत सहमती बनली. नव्याने निवडणूक झालेल्या चार व पूर्वीच सदस्य असलेल्या आठ अशा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकासाचे मूलभूत काम व्हावे यासाठी माकपच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. 


पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात विविध ग्रामपंचायतींमध्ये डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकरी व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती अकोले तालुक्यातील माकपच्या ग्रामपंचायत सदस्यांना यावेळी नामदेव भांगरे व सदाशिव साबळे यांनी करून दिली. तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत अंतर्गत माकपच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या बिहार पटर्नची माहितीही यावेळी सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आली. पुढील आठवड्यात तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा एक अभ्यास दौरा आंबेगाव तालुक्यातील फलोदे विभागात आयोजित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 


आंबेगाव पटर्नमधून प्रेरणा घेत अकोले तालुक्यात, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील शिक्षण गुणवत्ता सुधारणा, बिहार रोजगार हमी पॅटर्ननुसार गावस्तरावर वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षण व रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधांचा परिणामकारक विस्तार, जलसंधारण, वाचनालये, अभ्यासिका, बियाणे बँक, व्यायामशाळा, क्रीडांगणे, सांस्कृतिक विकास, बचत गट व शेतकरी गटांचा विकास, शेतकरी कंपन्यांची स्थापना व रोजगार निर्मितीचे विविध उपक्रम राबवत अकोले तालुक्यात आंबेगाव मॉडेलनुसार ग्रामविकासाचा पर्यायी मार्ग मजबूत करण्याचा संकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा