Breaking
आंबेगाव : आपटीत रोजगार हमीच्या कामाला सुरुवात; लोकांना मिळालं गावातच काम...आंबेगाव (पुणे) : किसान सभा, स्थानिक ग्रामविकास समिती आणि ग्रामपंचायत गंगापूर बु. यांच्या सहकार्यातून दि. 23 जानेवारी 2021 रोजी आपटी (ता. आंबेगाव) येथे रोजगार हमी योजने अंतर्गत आपटी ते जुन्नर शिव या रस्त्याच्या कामाचे उदघाटन होऊन कामाला सुरुवात करण्यात आली.


यावेळी सरपंच राजु गाडेकर, ग्रामसेविका श्रीमती नंदकर, ग्रामपंचायत सदस्या भामाबाई गवारी, तांत्रिक अधिकारी रेडेकर, कृषी सहाय्यक उगले तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक जनतेला प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच 'अबकी बार सिर्फ रोजगार..' हे डॉ. अजित अभ्यंकर यांचे पुस्तक भेट देऊन आपटी ग्राम विकास समितीचे अध्यक्ष अविनाश गवारी, सचिव दत्ता गवारी, उपाध्यक्ष संदिप गवारी यांनी आभार व्यक्त केले.


आपटी हे आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव. यापुर्वी लोकांना डोंगर उतरून दुसऱ्याच्या बांधावर अत्यल्प मजुरीने कामावर जावे लागत होते. मात्र आता गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रोजगार हमी कायद्या अंतर्गत गावागावात काम सुरू होण्यासाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी यांनी गावोगावी बैठका घेऊन काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर त्याला यश आल्याचे किसान सभेने म्हटले आहे.


ऐन लॉकडाऊनच्या काळात स्थानिक प्रशासनाची उदासीनता व लोकांच्या रोजगाराची गरज लक्षात घेत किसान सभेने घोडेगाव तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मजुरांना ऑनलाइन काम मागण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी पुणे जिल्ह्यातून 7000 च्या वर लोकांनी मागणी केली होती.


आपटीच्या सुमारे 70 लोकांनी कामाची मागणी केली होती. मात्र तरीही स्थानिक प्रशासनाने सहकार्य न केल्याने तेव्हा कामे सुरू होऊ शकली नव्हती. त्यानंतर पुन्हा संघटनेने चिवटपणे तळेघर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढुन प्रशासनाचे या मुद्याकडे लक्ष वेधले, व त्यानंतर प्रशासनाने सहकार्य करत काम उपलब्ध करून दिलं आहे.


या प्रयत्नांमुळे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत गावात स्मशानभूमी, विहीर व जुन्नर शिव यांना जोडणारे 3 रस्ते तसेच वनविभागात सलग समतल चर इ. कामे सेल्फवर असून या कामातून लोकांना पुढील 3 - 4 महिने रोजगार मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा