Breaking


आंबेगाव : एसएफआय व आदिम संस्थेच्या वतीने घोडेगाव येथे मराठी राजभाषा दिन साजरा


घोडेगाव : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) आंबेगाव तालुका समिती, आदिम संस्था, किसान सभा व डी.वाय.एफ.आय. यांच्या वतीने घोडेगाव येथे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.


कवी कुसुमाग्रज यांचा जयंतीदिन म्हणून साजरा केला जाणारा मराठी राजभाषा दिन घोडेगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभेचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष राजू घोडे व एस.एफ.आय.चे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी हे उपस्थित होते.


यावेळी बोलताना राजू घोडे यांनी सांगितले की, 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपणही प्रयत्न करायला हवा. मराठी भाषेच्या विकासासाठी आणि वाढीसाठी, मराठी भाषा परिषद स्थापन करण्यात यायला हवी.' तसेच यावेळी उपस्थित एस.एफ.आय. आंबेगाव तालुका सचिव समीर गारे, एस.एफ.आय. पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, सागर पारधी, महेश गाडेकर, अनिल सुपे, गणेश काटळे, जालिंदर गाडेकर, संकेत तळपे इत्यादींनी आपापले मनोगत, कविता व लेखांचे वाचन देखील केले.


यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष राजू घोडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समीर गारे व प्रास्ताविक महेश गाडेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा