Breaking


आंबेगाव : किसान सभेच्या मागणीला यश; तलाठी सजाच्या ठिकाणी उपस्थित राहणार, वनहक्क दाव्यासंदर्भात झाला 'हा' निर्णय


आंबेगाव (पुणे) : किसान सभेच्या निवेदनाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली असून तलाठी सजाच्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष राजू घोडे यांनी सांगितले.


तलाठ्यांनी सजाच्या ठिकाणी उपस्थित राहून सेवा पुरवावी. प्रलंबित वनहक्क दावे त्वरित मंजूर करून घ्यावेत या मागण्यासंदर्भात किसान सभेने निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रमा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.बैठकीस तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष राजू घोडे, अविनाश गवारी, महेश गाडेकर उपस्थित होते.


पुढील १५ दिवसात रेंज उपलब्ध असलेल्या गावामध्ये व लोकांच्या सोईचे ठिकाण निश्चित करण्यात येईल. व तेथे तलाठी नियमित थांबतील. तोपर्यंत कुशिरे  व तळेघर या दोन्ही सजाचे तलाठी तळेघर येथे, तिरपाड सजाचे तिरपाड या ठिकाणी, वचपे सजाचे आडिवरे याठिकाणी व आंबेगाव सजाचे डिंभे या ठिकाणी तलाठी किमान दोन दिवस नियमित असतील. मंडल अधिकारी एक दिवस सजाच्या ठिकाणी येऊन सेवा देतील, असे ठरविण्यात आले.


प्रलंबित वनहक्क दावे कायद्यानुसार मान्य करून अंतिम मान्यतेसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्यात येतील, असे आदिवासी विकास विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा