Breaking


बार्शी : विचारांचा बार कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे कार्यकर्तेच उडवू शकतात - कॉ. तानाजी ठोंबरे

बार्शी : कष्टकरी वर्गाच्या समोर सर्व बाजूने संकटे उभी आहेत अशा परिस्थितीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे कार्यकर्तेच या परिस्थिती विरोधामध्ये विचारांचा बार उडवू शकतात, असे मत कॉ. तानाजी ठोंबरे यांनी शहीद कॉ. गोविंद पानसरे यांच्या 6 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सभेमध्ये व्यक्त केले.  


यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम आयटक कामगार केंद्र बार्शी येथे ता. 20 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला होता.


पुढे कॉ. तानाजी ठोंबरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कष्टकरी राज्याची संकल्पना केली होती हे राज्य निर्माण करण्यासाठी सध्या शेतकरी, शेतमजूर यांची एकजूट करून संघटीत पणाने सरकारच्या विरोधामध्ये उभा संघर्ष करावा लागेल.  पानसरेंच्या खुनामागे असणाऱ्या कारणांमध्ये 'खरे शिवाजी महाराज जनतेसमोर मांडले' हे एक कारण आहे. 


पानसरे यांच्या गुणांमध्ये कृतीशील विचारवंत, चिकाटी-धैर्याने पुढे जाणारे नेते, कार्यकर्ता घडवणारे, लोकांमध्ये जाणे, लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, वास्तव परिस्थिती बदलण्यासाठी लिखाण करणे, मार्क्सवादी तत्वज्ञानाचे चिंतन करणे, तरुणांना चळवळीत आणणे, संघटन कौशल्य, सोप्या भाषेत समजावने, क्रांतिकारी भूमिका घेऊन लढ्याच्या मैदानात उतरणे हे गुण कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंगी होते, शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहून त्यांनी खरे शिवाजी महाराज जनतेत पोहोचवले त्या पुस्तकाच्या लाखो प्रती छापल्या जात आहेत व विकल्या जात आहेत. धर्मांध शक्तींना याच बाबींचा धोका वाटल्याने त्यांचा खून करण्यात आला. पुढील काळ हा पानसरेंनी स्वीकारलेल्या कम्युनिस्ट विचाराने बदलण्याचा आहे, असे ते म्हणाले.


यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रवीण मस्तुद, कॉ. रशिद इनामदार, कॉ. लक्ष्मण घाडगे, पांडुरंग यादव, अनिरुद्ध नखाते, पवन आहिरे, दीपक कोकाटे, धनाजी पवार, लहू आगलावे, भारत भोसले, शौकत शेख आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा