Breaking



मोठी बातमी : शेतकरी दडपशाहीच्या निषेधार्थ 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचे देशभर चक्का जाम आंदोलन



मुंबई : दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. भाजपचे कार्यकर्ते स्थानिक व्यापारी असल्याचे भासवत आंदोलकांवर पोलिसांच्या मदतीने दगडफेक करत असल्याचा ही आरोप केला जात आहे.


आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले असल्याचे ही किसाश सभेने म्हटले आहे.


आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे. संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांंत धिक्कार केला आहे. 


सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व तीन कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळात देशभर रास्तारोको करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, माजी आमदार जे.पी.गावीत, राज्य अध्यक्ष किसन गुजर, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, उमेश देशमुख यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा