Breaking
6 फेब्रुवारी : देशव्यापी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - अशोक यादवसातारा : दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी आणि सत्य जगासमोर येऊ नये यासाठी केंद्र सरकार करीत असलेली अमानुष दडपशाही निषेधार्ह आहे असा आरोप करून येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हजर रहावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक यादव यांनी केले आहे. 


याबाबत किसान सभेच्या वतीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राक्षसी बहूमताच्या जोरावर भांडवलदार आणि उद्योगपती धार्जिणे आहेत. शेतकरी हिताचे म्हणून केलेल्या नविन कृषी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या चारही  सिमांवर सुरु असलेले आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करून तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे.


भाजप कार्यकर्ते स्थानिक नागरिक असल्याचे भासवत पोलिसांच्या मदतीने आंदोलक शेतकऱ्यांवर दगडफेक करत आहेत. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे. किसान सभा सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार करत असल्याचेही यादव म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा