Breaking


नवीन अपडेट : पुणे, पिंपरी - चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा, कॉलेज 28 फेब्रुवारीपर्यंत बंद


जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू


पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्याने सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले असून, पुणे शहर आणि पिंपरी - चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे .


दरम्यान, पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, शहरात रात्री 11 ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू राहील. पुण्यामध्ये हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री 11 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. शहरातील कोचिंग क्लासेस बंद राहतील. मात्र अभ्यासिका सुरू राहतील. तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच लग्नसोहळ्यासाठी केवळ 200 जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.


दरम्यान पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ज्या भागात रुग्ण अधिक वाढत आहेत, अशा ' हॉटस्पॉट ' प्रभावी नियोजन करून आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे ( Containment Zone ) निर्माण करावेत अशा सूचना पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत केल्या.


बैठकीतील मुद्दे पुढीलप्रमाणे : 


◆  पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेज 28 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. नंतर पालकमंत्र्यांशी चर्चा करून आढावा घेऊन पुढील शुक्रवारी ( दि . 26 ) नवीन निर्णय घेतला जाईल.


◆ खाजगी क्लासेस देखील बंद राहतील. 


◆ स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणासाठी चालवले जाणारे खाजगी क्लासेस 50 टक्के उपस्थितीने चालू राहतील. 


◆ लग्न समारंभ, संमेलन, खाजगी कार्यक्रम, राजकीय कार्यक्रमावर निर्बंध आहेत. लग्न समारंभासाठी 200 लोकांची मर्यादा असणार आहे. आजवर  200 लोकांचीच मर्यादा होती. पण त्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आता हे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई होईल. मंगल कार्यालयांना देखील परवानगी घ्यावी लाणार आहेत, अन्यथा कारवाई होणार आहे.


◆ पोलिसांच्या परवानगी शिवाय कोणताही लग्न समारंभ होणार नाही. सिंगल विंडो सिस्टमने दोन तासाच्या आत परवानगी मिळेल. नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.


◆ हॉटेल, बार रेस्टोरंट रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. आतापर्यंत हॉटेल, बार आणि रेस्टोरंट रात्री एक वाजेपर्यंत सुरु होती. 1 वाजेपर्यंत सुरु असताना युवा वर्ग मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर दिसत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 


◆ रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक नसलेल्या हालचालींवर निर्बंध असतील. संचारबंदी नसेल मात्र अनावश्यक फिरता येणार नाही. व्यापारी, हॉटेल असोसिएशन यांच्या सोबत बैठक घेऊन त्याबाबत अधिक निर्णय घेतले जाणार.


◆ ग्रामीण भागात आज ( रविवार, दि . 21 ) पासून कोविड सेंटर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. होम क्वारंटाईनमुळे कोरोना पोझीटीव्हीचा दर वाढत असल्याचे निदर्शनास आले असल्याने हे सेंटर सुरु केले जात आहेत.


◆ मंडईमध्ये निर्बंध कमी असतील. पहाटेच्या वेळी भाज्यांची वाहतूक होते. त्यावर निर्बंध नसतील.


◆ जिल्ह्यातील 73 टक्के आरोग्य कर्मचा - यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच 56 टक्के फ्रंट लाईन वर्करचे लसीकरण पूर्ण झाले आहे. फ्रंट लाईन वर्करचे नोंदणीकरण न झाल्याने काही अडचणी येत आहेत. त्यांची नोंदणी करून लवकरात लवकर लसीकरण केले जाईल. 


◆ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आणि संवाद स्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध सामाजिक संघटनांची मदत घेतली जाईल.A

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा