Breaking

पिंपरी चिंचवड : केंद्रिय अर्थमंत्र्यांवर 420 चा गुन्हा दाखल केला पाहिजे - डॉ. अजित अभ्यंकर



पिंपरी (पुणे) : मोदी सरकार म्हणजे जनतेची दिशाभूल करणारे फसवे सरकार आहे. नुकत्याच सादर केलेल्या केंद्रिय अर्थसंकल्पात आकडेवारीचा खेळ करुन जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. मागील अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी 67 हजार कोटींची तरतूद केली होती. ती यावर्षी 74 हजार कोटींची केली आहे आणि 137 टक्के वाढ केल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले. प्रत्यक्षात पाणी आणि रस्ते स्वच्छतेसाठी केलेली तरतूद आरोग्यासाठी दाखवून आकडेवारी सादर केली आहे. अशी फसवणूक आणि दिशाभूल करणारी आकडेवारी देऊन प्रसिध्दी मिळणा-या अर्थमंत्र्यांवर 420 चा फसवणूकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी टिका कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी केली.


आज (दि. 3 फेब्रुवारी) बुधवारी त्या अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निदर्शने करुन ‘कामगार कायद्याची प्रत’ जाळून होळी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. देशभर विविध कामगार संघटनाच्या वतीने ‘राष्ट्रीय निषेध दिन’ पाळण्यात आला. 


यावेळी डॉ. अजित अभ्यंकर म्हणाले की, पेट्रोल, डिझेलच्या एक्साईज ड्युटी मधिल काही हिस्सा राज्यांना द्यावा लागतो. एक्साईज ड्युटी मधिल राज्यांचा वाटा द्यायला नको म्हणून एक्साईज ड्यूटी कमी करुन ‘कृषी अधिभार’ नावाने नवीन कर सुरु केला आहे. आता पुढील काळात एक्साईज ड्युटीमध्ये वाढ न करता ‘कृषी अधिभार’ वाढविला जाईल आणि हा कृषी अधिभार केंद्राच्याच ताब्यात राहिल. फायद्यातल्या बँका आणि पीबीसीएल सारख्या फायद्यातील सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा उद्योग मोदी सरकार करीत आहे. त्यामुळे आगामी काळात बजेटमध्ये तूट निर्माण झाली तर पुर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊन देश दिवाळखोरीत जाईल.


यावेळी शेतकरी विरोध तीन कायदे रद्द करा, कामगार संहिता रद्द करा, हे कायदे रद्द करुन पुर्वीचेच कायदे अंमलात आणावेत यासह अन्य मागण्या करण्यात आल्या.


यावेळी मानव कांबळे, मारुती भापकर, अरुण बो-हाडे, दिलीप पवार, मनोहर गडेकर, वसंत पवार, डॉ. सुरेश बेरी, निरज कडू, किशोर ढोकळे, भारती घाग, गणेश दराडे, संजय गायके, सचिन देसाई, विशाल जाधव, आबा खराडे, संजय गायकवाड, प्रल्हाद कांबळे, इसाक शेख हे  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा