Breakingअहमदनगर : डीवायएफआयचे अकोले मध्ये आंदोलन, राज्यात रोजगार व शिक्षणाचा प्रश्न गंभीर


अकोले : राज्यातील शिक्षण व रोजगाराचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहेत. बेरोजगारी वाढत असून कोरोना महामारीमुळे शिक्षणाचेही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यावेत व विद्यार्थी युवकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी डीवायएफआय या युवक संघटनेच्या वतीने आज (दि. २३) रोजी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देत आंदोलन करण्यात आले. 


राज्यात सरकारी रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, स्पर्धा परीक्षा नियमित व पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात, शासकीय नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षा खाजगी संस्थांमार्फत घेणे थांबवावे, राज्यात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी धोरणे घ्यावीत, ग्रामीण भागात कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीस चालना द्यावी, रोजगार हमी योजना अधिक परिणामकारक पद्धतीने राबवावी या मागाण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले.


तसेच कोरोना महामारीमुळे अकोले तालुक्यात रोजगार व शिक्षणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, आदिवासी भागातील मजुरांना कामासाठी बाहेरच्या विभागात जाण्यात मोठ्या मर्यादा आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, ग्रामीण भागात मोबाईल रेंज नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून आदिवासी व इतर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीच्या कामांची सुरुवात करावी, ऑनलाईन शिक्षणाचे प्रश्न सोडवावेत व तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी तालुक्यात एम. आय. डी. सी. सुरू करावी, या सुध्दा मागण्या करण्यात आल्या.


यावेळी किसान सभेचे नामदेव भांगरे,  डीवायएफआयचे अध्यक्ष एकनाथ मेंगाळ, भीमा मुठे, राजाराम गंभीरे, होनाजी मुठे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा