Breaking



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली ज्येष्ठ विचारवंत प्रा.विलास वाघ यांना श्रद्धांजली


मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, सुगावा प्रकाशनाचे संपादक प्रा. विलास वाघ यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रा.वाघ यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळींचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना दिशा देण्यासाठी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रा.विलास वाघ यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी अनेकांना लिहिण्याची प्रेरणा दिली. या लेखकांना मराठी साहित्य प्रवाहांमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले. सामाजिक चळवळींतील कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासकांसाठी ते मार्गदर्शकस्थानी होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळींचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. प्रा.विलास वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


प्रा. विलास वाघ यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रा.विलास वाघ हे कृतीशील विचारवंत होते. त्यांनी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांच्या मुलांसाठी शाळा, वसतीगृहे सुरु केली. मागास बांधवांना सोबत घेऊन सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्यशोधक परिवर्तनवादी विचारांचा प्रचार-प्रसार केला. या महामानवांच्या विचारांवर निष्ठा ठेवून राज्यातील प्रबोधनाची, परिवर्तनाची, सामाजिक सुधारणांची चळवळ पुढे नेण्याचे काम केले. सामाजिक प्रबोधनासाठी विपुल लेखन केले. शैक्षणिक, सामाजिक सुधारणांना बळ दिले. त्यांचे निधन ही राज्यातील पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांनी सुरु केलेले समाजप्रबोधनाचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी प्रा. विलास वाघ यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा