Breakingपुण्यात महावितरण आणि मनपामध्ये संघर्ष उफाळला, अधिकाऱ्यांचे जशास तसे उत्तर


पुणे : शहरात करोनाच्या साथीने थैमान घातले असतानाच महावितरण कर्मचाऱ्यांनी जम्बो हॉस्पिटलच्या वॉर रूमची वीज सहा लाखांच्या थकबाकीसाठी तोडली. तर औंध येथील सुमारे 250 रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाची वीज तोडण्यासाठीही महावितरणचे पथक पोहचले होते. वसुलीचे भूत डोक्‍यावर घेऊन कारवाई करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना उपचार घेणाऱ्या रुग्णांचा जीव घ्यायचा आहे का, असा सवाल पालिकेने उपस्थित केला आहे. 


तर महावितरणने सुमारे 50 लाखांपेक्षा अधिकची पाणीबिले थकवल्याने सेनापती बापट रस्त्यावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयासह, शहरातील सर्व प्रमुख कार्यालयांचा पाणीपुरवठा महापालिकेने तोडला आहे.


महावितरणने शहरात थकबाकीदारांची वीजतोड मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत महावितरणचे पथक शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरला शुक्रवारी दुपारी पोहचले. तेथील वॉर रूमसाठी दीपाली डिझायनर नावाने मीटर देण्यात आले आहे. याची सुमारे 6 लाखांची थकबाकी असल्याने या वॉररूमचा पुरवठा कर्मचाऱ्यांनी तोडला. त्यातच, हे हॉस्पिटल सोमवारपासून सुरू करत असल्याने संबंधितांनी महापालिकेस कळवले. त्याच वेळी महावितरणचे एक पथक बाणेर येथील कोविड रुग्णालयात पोहचले. यावेळी तेथे सुमारे 250 रुग्ण ऑक्‍सिजवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे असतानाही; हे कर्मचारी वीज तोडण्यावर ठाम होते. त्यामुळे वाद नको म्हणून महापालिकेने तातडीनं 27 लाखांचा धनादेश महावितरणला दिल्याचे महापालिका विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.


दरम्यान, या प्रकारांमुळे संतापलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर महावितरणला झटका देण्याचा निर्णय घेत 15 हून अधिक कार्यालयांचे पाणी तोडण्याची कार्यवाही सुरू केली.


महावितरणची सारवासारव


महानगरपालिकेशी संबंधित कोविड कंट्रोल रुमचे कंत्राट दीपाली डिझाइनर यांना देण्यात आले आहे, असे महापालिकेकडून कळवताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडून देण्यात आल्याचे महावितरणने म्हटले आहे.


कोरोनाची स्थिती गंभीर आहे. रुग्ण असलेल्या ठिकाणी येऊन बिलासाठी नोटीस देणे अथवा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देणे योग्य नाही. दोन्ही शासकीय विभाग असल्याने महावितरणने समन्वयाची भूमिका घेणे आवश्‍यक आहे.


- राजेंद्र मुठे, उपायुक्‍त, मालमत्ता व्यवस्थापन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा