Breakingप्रधानमंत्री घरकुल योजना घोटाळ्याची चौकशी करा : सुशिलकुमार पावरा


नंदुरबार : प्रधानमंत्री घरकुल योजना घोटाळ्याची चौकशी करा व भ्रष्टाचार  करणाऱ्या संबंधित  अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री घरकुल योजनेत बोगस लाभार्थी दाखवून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. लाभार्थी कडून पैसे उकडण्याचेही काम संबंधित अधिकारी करीत आहेत, अशा तक्रारी संघटनेस प्राप्त होत आहेत. या भ्रष्टाचारात योजनेंतर्गत काम पाहणारे संबंधित अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. 


आदिवासी बहूल जिल्ह्यात हा भ्रष्टाचार अधिक झालेला आहे. विशेषतः नंदुरबार जिल्ह्यात धडगांव, शहादा, अक्कलकुवा, नवापूर या तालुक्यात या योजनेत सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे. या संदर्भात आमच्या बिरसा क्रांती दल संघटनेस शहादा व धडगांव तालुक्यातून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घरकुल योजने अंतर्गत एक लाख अडतीस हजार ते दीड लाख रूपये लाभार्थीस घर बांधण्यासाठी मिळतात. परंतु या दीड लाख रूपयांपैकी फक्त 15 हजार रूपयेच अद्याप लाभार्थीस मिळाले आहेत. केवळ 15 हजार रूपयांत संपूर्ण  घरकाम होत नाही. संबंधित अभियंता अधिकारी यांनी घरकामाचे फोटो नेऊन 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. तरी उर्वरित रक्कम जमा करत  नसल्यामुळे घराचे काम अर्धवटच राहीले असून याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी शहादा येथील एका लाभार्थीने केली  आहे.


एकाच घरातील 5 अथवा 10 सदस्यांची नावे दाखवून रक्कमा काढणे, लाभार्थीचे नाव वेगळे व रक्कम निरळ्या व्यक्तीच्या खात्यात जमा करणे, जणगणनेत नावे नसलेली नावे लाभार्थी म्हणून दाखवणे,खरे लाभार्थी यांची नावे वगळणे, घरकुल लाभार्थी यांच्या कडून पैशांची मागणी करणे, पैसे न दिल्यास योजनेचा हफ्ता जमा न करणे इत्यादी प्रकारे संबंधित अधिकारी यांनी गैर प्रकार करून भ्रष्टाचार केलेला आहे. या भ्रष्टाचारात संबंधित अधिकारी व कर्मचारी  यांची साखळी असून संगनमतानेच हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. तेव्हा प्रधानमंत्री घरकुल योजनेची तात्काळ आपल्या सरकार मार्फत चौकशी करून संबंधित गैर प्रकार करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करा व तात्काळ सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा