Breaking२३ मार्च : महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या व राज्य सरकारच्या नोकरभरती प्रकियेविरुद्ध विद्यार्थी-युवकांचे राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण


मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या व राज्य सरकारच्या नोकरभरती प्रकियेविरुद्ध स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) च्या वतीने २३ मार्च रोजी राज्यभर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.


23 मार्च हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतीकारक प्रेरणा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तत्कालीन विषमता आणि गुलामी व्यवस्था बदलण्यासाठी देशातील तरुणांना एकत्र करून देशकार्यात सहभागी केले. त्यांचे कार्य आजही स्फूर्तिदायक आहे. त्यांच्या हौतात्म्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी-युवकांचे शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न घेऊन SFI व DYFI च्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली आहे.


सध्या महाराष्ट्रात नवे शैक्षणिक धोरण आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व 10 वी 12 वी परीक्षेबाबत सरकारची ढिसाळ यंत्रणा आणि अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे.


हे आंदोलन जिल्हा परिषद, प्रांतकार्यालय,  महानगरपालिका, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पालिका, तहसील कार्यालय या ठिकाणी करण्यात येणार आहे, अशी माहिती 'डीवायएफआय'चे राज्य अध्यक्ष सुनील धानवा, राज्य सरचिटणीस प्रीति शेखर, 'एसएफआय'चे राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सरचिटणीस रोहिदास जाधव यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा